वसई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला नेस्तनाबूत केल्यानंतर भाजपने आता वसई-विरार महापालिकेतूनही ‘ठाकूर’शाही संपवण्यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांना नमवून विजयी झालेल्या भाजपच्या स्नेहा दुबे-पंडित यांनी ‘सासऱ्याच्या हत्येचा सूड उगवला’ अशा पद्धतीचा प्रचार सध्या जोरात सुरू असून त्या माध्यमातून ठाकूर कुटुंबाशी जोडला गेलेला दहशतीचा मुद्दा अधोरेखित करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९० पासून हितेंद्र ठाकूर यांची वसई विरारच्या राजकारणावर निर्विवाद सत्ता आहे. विधानसभेच्या ६ निवडणुका हितेंद्र ठाकूर यांनी जिंकल्या होत्या. राजकारणासहित विविध क्षेत्रात त्यांचे वर्चस्व आणि दबदबा असल्याने त्यांचा पराभव कुणी करू शकत नाही असे म्हटले जात होते. मात्र राजकारणात नवख्या असलेल्या ३८ वर्षांच्या स्नेहा दुबे पंडित यांनी ठाकूरांचा ३ हजार मतांनी पराभव केला. अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी स्नेहा यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली. राजकारणात नवख्या असल्या तरी उच्चशिक्षित तरुण महिला उमेदवार या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. भाजपच्या मजबूत यंत्रणेमुळे त्या जिंकल्या. त्याबरोबरच बविआने आपल्या ताब्यात असलेल्या अन्य दोन जागाही गमावल्या. त्यामुळे विधानसभेतून बविआचे अस्तित्वच संपुष्टात आले. आता महापालिकेतही बविआकडून सत्ता काबीज करण्याचे भाजपचे प्रयत्न असून स्नेहा यांच्या विजयाच्या निमित्ताने सुरू असलेला प्रचार याच रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा >>> नवी मुंबईत भाजपच्या दोन संघटना? बेलापूरात पक्षाच्या जोर बैठका, ऐरोलीत नाईकांच्या आभार मेळावे

ठाकूरांना आव्हान

● १९८९ साली भाई ठाकूर टोळीकडून सुरेश दुबे यांची रेल्वे स्थानकात हत्या करण्यात आली. त्या सुरेश दुबे यांचे बंधू श्यामसुंदर दुबे यांच्या स्नेहा पंडित या स्नुषा आहेत.

● विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दुबे हत्या प्रकरणाचा मुद्दा वारंवार उपस्थित करून ठाकूर परिवाराच्या दहशतीकडे बोट दाखवण्याचे काम भाजपने केले. आता विजयानंतरही ‘दुबे यांच्या हत्येचा बदला घेतला’ असा संदेश नागरिकांमध्ये पोहोचवला जात आहे.

● स्नेहा या स्वत:देखील आता दहशतवादाविरोधात लढत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे ठाकूरांच्या उरलेल्या साम्राज्याला स्नेहा दुबे यांनी एकप्रकारे आव्हान निर्माण केले आहे.

● ठाकूरांचा पराभव करता येतो हे स्नेहा दुबे-पंडित यांनी दाखवून दिल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. या अनुकूल परिस्थितीचा फायदा महापालिकेतही घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp making strategy to end thakur rule from the vasai virar municipal corporation print politics news zws