विकास, विरासत (हिंदुत्व) आणि गरिबांचे कल्याण या त्रिसूत्रीला गुंफणारे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे ‘संकल्पपत्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी, आंबेडकर जयंतीदिनी जनतेला सादर केले. त्यानिमित्ताने ‘मोदी की गॅरंटी’ या निवडणूक प्रचारातील घोषवाक्याचा पुनरुच्चार भाजपने केला.
देशभर समान नागरी कायदा लागू करण्याची आणि सर्व निवडणुका एकाचवेळी घेण्याची हमी तसेच, ७० वर्षांच्या सर्व वयोवृद्धांना तसेच तृतीयपंथीयांना आयुष्यमान योजना लागू करण्याच्या महत्त्वपूर्ण घोषणा संकल्पपत्रात करण्यात आल्या असून आहेत. तसेच, घोटाळेबाजांना दयामाया न दाखवता तुरुंगात टाकणारी भ्रष्टाचाराविरोधी मोहीम यापुढेही चालू राहील, अशी हमी देत विरोधकांना चपराक देण्यात आली आहे.
भारताने चंद्रयान मोहीम यशस्वी केली, आता गगनयान मोहिमेअंतर्गत २०२५ मध्ये अंतराळवीरांना अंतराळात पाठवले जाईल. ‘जी-२०’चे यशस्वी आयोजन केल्यानंतर २०३६ मध्ये ‘ऑलम्पिक’ स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी तयारी सुरू केली जाईल. देशातील १४० कोटी जनतेच्या अशा असंख्य महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे हेच मोदीचे ‘मिशन’ आहे, अशी ग्वाही जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर झालेल्या भाषणात मोदींनी दिली.
हेही वाचा : राहुल गांधींनी म्हैसूर पाकची मिठाई केली खरेदी अन् ‘भाऊ’ एमके स्टॅलिन झाले भावुक; नेमकं काय घडलं?
भाजपने जाहीरनाम्याला ‘मोदी की गॅरंटी-२०२४’ असे संबोधले असून मोदींनी केंद्रात तिसऱ्यांदा पूर्ण बहुमतातील सरकार निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले. भाजपच्या ६९ पानी संकल्पपत्रामध्ये विद्यमान कल्याणकारी योजनांच्या विस्तारीकरणाची हमी देण्यात आली आहे.
सामान्यांच्या जगण्याचा प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यांच्या जगण्याचा दर्जा सुधारला पाहिजे, त्यासाठी विकासाच्या विविध आणि दर्जात्मक संधी मिळाल्या पाहिजेत, त्यादृष्टीने केंद्रातील भाजप सरकार कार्यरत राहील.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
‘विकसीत भारता’साठी बहुमत हवेच!
२०४७ पर्यंत देशाला विकसीत आणि समृद्ध करायचे असेल तर केंद्रात सक्षम सरकारची आवश्यकता आहे. ४ जूनला भाजपचे सरकार केंद्रात आल्यावर तातडीने संकल्पपत्राच्या ध्येय पूर्तीसाठी काम सुरू केले जाईल. नव्या सरकारच्या पहिल्या १०० दिवसांतील कार्याचा कृती आराखडा आधीच तयार केला असल्याचे सांगत मोदींनी ‘तिसरी बार मोदी सरकार’ची अप्रत्यक्ष घोषणा केली.
चारी दिशांना बुलेट ट्रेन…
मुंबई ते अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम युद्धपातळीवर सुरू असून पुढील काही वर्षांमध्ये देशातील चारही दिशांना बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा मोदींनी केली. पश्चिमेकडील बुलेन ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आले असून पूर्व, दक्षिण व उत्तर भागांमध्ये आणखी तीन बुलेट ट्रेन धावतील, त्यासाठी सर्व्हेक्षणाची काम तातडीने हाती घेतले जाईल असे मोदी म्हणाले.
आंबेडकरांचा अर्धपुतळा, संविधानाची पत्र…
भाजपच्या मुख्यालयाच्या विस्तारित कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा व संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. रविवारी, १४ एप्रिल रोजी, जयंतीनिमित्त आंबेडकरांना अभिवादन करून मोदींनी संकल्पपत्राचे अनावरण केले. यावेळी जाहीरनामा समितीचे अध्यक्ष व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, समितीच्या समन्वयक व अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे तमाम नेते, राष्ट्रीय पदाधिकारी-प्रवक्ते समारंभाला उपस्थित होते. २०१४ व २०१९ च्या जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केल्याचा दावा राजनाथ सिंह व नड्डा यांनी केला.
हेही वाचा : उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज
विकासस्तंभांना ‘मोदींची गॅरंटी’
गरीब, युवा, अन्नदाता (शेतकरी) आणि नारी (महिला) या देशाच्या विकासातील प्रमुख चार स्तंभांना (ग्यान) संकल्पपत्र अर्पण करण्यात आले. आर्थिक दुर्बल गटातील रघुवीर, सुमंगल योजनेचा लाभार्थी तरुण रवीकुमार, किसान निधीचा लाभार्थी शेतकरी रामवीर आणि उज्ज्वला योजनेची लाभार्थी महिला लीलावती मौर्य या ‘ग्यान’ते प्रतिनिधित्व करणाऱ्या चौघांना संकल्पपत्र स्वाधीन करून मोदींनी ‘गॅरंटी’ देऊ केली.
योजनांचा ‘विस्तार’वाद
‘मोदींच्या गॅरंटी’मध्ये नव्या आश्वासनांपेक्षा जुन्या योजनांच्या विस्तारावर अधिक भर देण्यात आला आहे. गरिबांसाठी मोफत धान्य योजना पुढील ५ वर्षे चालू राहील. जनऔषधी केंद्रांचा देशभर विस्तार करून औषधांवरील ८० टक्के सवलत कायम राहील. गरिबांसाठी आणखी ३ कोटी घरे बांधली जातील. मोफत वीज व उत्पन देणाऱ्या सूर्यघर योजनेचा विस्तार, मुद्रा कर्ज योजनेची मर्यादा २० लाखांपर्यत वाढवणार. उज्ज्वला गॅस योजनेचा विस्तार पाईप गॅस योजनेपर्यंत करणार. स्वनिधी योजना शहरातून गावांमध्ये नेणार. ३ कोटी लखपती महिलांचे लक्ष्य गाठणार. २ कोटी छोट्या शेतकऱ्यांसाठी श्रीअन्न योजनाचा विस्तार करणार. ‘५ जी’चा विस्तार करून ‘६जी’ सेवा कार्यान्वित करणार. अशा यापूर्वीच लागू झालेल्या अनेक योजनांचे विस्तारीकरण केले जाणार आहे.