पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (२८ ऑगस्ट) रोजी पक्षाच्या युवक मेळाव्याला संबोधित करत असताना भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा कदाचित याचवर्षीच्या अखेरीस डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुका घेऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी भाजपाकडून देशभरात हेलिकॉप्टर्स बुक करण्यात आले असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच भाजपा जर तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास देशात हुकूमशाही लागू करेल, असा इशारा युवक मेळाव्यात बोलत असताना त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर भाजपा तिसऱ्यांदा सत्ते आल्यास देशात हुकूमशाहीचे शासन दिसेल. लोकसभेच्या निवडणुका यावर्षी डिसेंबर महिन्यात किंवा नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्या म्हणाल्या. भाजपाने आताच देशातील समाजासमाजामध्ये वैमनस्य निर्माण केले आहे, जर ते पुन्हा सत्तेवर आले तर आपला देश द्वेषावर आधारित राष्ट्र बनेल, असेही बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. भारतातील विद्यमान लोकसभेची मुदत २०२४ मध्ये संपत आहे. भाजपाने आतापासून देशभरातील हेलिकॉप्टर्स बुक करून ठेवले आहेत. जेणेकरून निवडणुकीची घोषणा झाली तर इतर राजकीय पक्षांना त्यांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध होऊ शकणार नाहीत, असा दावा बॅनर्जी यांनी केला.

हे वाचा >> भाजपाला शह देण्यासाठी ममता बॅनर्जींची ‘माँ, माटी’ रणनीती; लवकरच ‘पश्चिम बंगाल दिन’ साजरा करण्याचा प्रस्ताव!

अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगाणा जिल्ह्यात रविवारी सकाळी अवैध फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्यामुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाल्या, “काही लोक अवैध धंद्यात गुंतलेले असून त्यांना काही भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. पोलिस प्रशासनातील बहुतेक अधिकारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात. पण काही भ्रष्ट पोलिस अधिकारीच अवैध धंद्यांना बळ देतात. या लोकांना मी इशारा देते की, ज्याप्रमाणे रँगिंग विरोधी विभागाची स्थापना करण्यात आली आहे. त्याप्रमाणे भ्रष्टाचार विरोधी विभागाचीही स्थापना करून अशा लोकांना धडा शिकवू.”

जे लोक फटाके निर्माण करण्याच्या व्यवसायात आहेत, त्यांनी आता हरित फटाके निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. “हरित फाटके उत्पादित करण्यात अडचण काय आहे? कदाचित तुमचा नफा थोडासा कमी होईल. पण हा अतिशय सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असा पर्याय असेल”, असेही त्या म्हणाल्या.

‘पंगा घेऊ नका’, राज्यपालांना इशारा

राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस यांच्यावरी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी टीका केली. राज्यपाल संवैधानिक नियमांचा भंग करत असून त्यांच्या घटनेच्या विरोधातील कृत्यांना मी पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “लोकांनी निवडून दिलेल्या सरकारविरोधात ‘पंगा’ घेऊ नका”, असा इशाराच त्यांनी दिला.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, त्यांनी राज्यातील तीन दशकापासून असलेले कम्युनिस्ट पक्षाचे सरकार उलथवून लावले आणि आता त्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थी मृत्यूच्या प्रकरणानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपाच्यावतीने ‘गोली मारो’ घोषणा देण्यात आल्या, यावरही बॅनर्जी यांनी आक्षेप व्यक्त केला. अशाप्रकारच्या द्वेषपूर्ण घोषणा देणाऱ्यांना अटक करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. “ज्यांनी अशाप्रकारच्या घोषणा दिल्या, त्यांनी हे विसरू नये की, हा उत्तर प्रदेश नसून बंगाल आहे”, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीबाबत जे भाकीत वर्तविले त्यावर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)चे नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती ठेवण्यात मुख्यमंत्री (बॅनर्जी) पटाईत आहेत. जर त्या असे काही बोलत असतील तर कदाचित राष्ट्रीय स्वंयसेवक संघ असा विचार करत असेल, अशी प्रतिक्रिया चक्रवर्ती यांनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp may go for lok sabha election in december 2023 has booked all helicopters for campaigning mamata banerjee kvg
Show comments