लोकसभा निवडणूक २०२४ च्या आधी राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात भाजपाचे सरकार नाही, तर मध्य प्रदेशमध्येही मागच्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. यंदा तीनही राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्यापैकी राजस्थानमध्ये अंतर्गत धुसफूस असूनही भाजपाने सामूहिक नेतृत्वाद्वारे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये मात्र त्यांनी शिवराज सिंह चौहान यांचा चेहरा घेऊन पुन्हा एकदा लोकांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी (दि. २९ जुलै) राजस्थानमध्ये सभा घेऊन मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची काय रणनीती असेल यावर राज्यातील नेत्यांशी त्यांनी चर्चा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानमध्ये मागच्या नऊ महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठ दौरे झाले आहेत. तर जेपी नड्डा यांचा १३ दिवसांतील शनिवारी (२९ जुलै) झालेला दुसरा दौरा होता. केंद्रीय नेतृत्व राजस्थानमधील संघटनेला एकत्र ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. मागच्या काही काळात संघटनेत अनेक गट-तट पडले आहेत. राजस्थानच्या राजकारणातील भाजपाच्या सर्वात प्रमुख नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या आगामी काळातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण राहिल? हे जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. केंद्रीय नेतृत्वाने मुख्यंमत्री पदाबाबत कोणतीही घोषणा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढे करून विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय तुर्तास घेतल्याचे दिसून येते.

हे वाचा >> “आया-बहिणींवरचे अत्याचार ‘राजस्थान’ सहन करणार नाही”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेस सरकारवर टीका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुंधरा राजे यांनी केंद्रीय नेतृत्वाला संदेश पाठवून आगामी निवडणुकीत त्यांच्यावर काय जबाबदारी असेल? हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. राजे यांच्या निकटवर्तीयांचा दावा आहे की, वसुंधरा राजे यांच्याएवढी लोकप्रियता आणि लोकांना स्वीकाहार्य असलेला दुसरा कोणताही तोडीचा नेता राज्यात नाही. भाजपामधील सूत्रांनी सांगितल्यानुसार, केंद्रीय नेतृत्वाने त्यामुळेच निवडणुकीचा चेहरा जाहीर करण्यासाठी थोडे सबुरीने वागण्याचा निर्णय घेतला आहे. सामूहिक नेतृत्वामध्ये जर पक्षाचा राज्यात विजय झाला तर ज्या चेहऱ्याला सर्वाधिक पसंती असेल त्यांना मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते.

दिल्लीतील भाजपा नेत्याने सांगितले की, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आता सध्या निवडणुकीच्या जबाबदारी सोपविण्याची वेळ आहे. कोणत्या तरी एका नेत्याला जाहीर केले तर त्याचे फायदे आणि तोटे दोन्हींचा सामना पक्षाला करावा लागू शकतो. सूत्रांनी सांगितले की, राजेंचा संघटनेवरील प्रभाव पाहता, त्यांना प्रमुख भूमिका देण्याचा विचार केला जाऊ शकतो. तरीही त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यास नेतृत्वाकडून संकोच केला जात आहे.

तर मध्य प्रदेशमध्ये मात्र भाजपाने विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हेच पुढील निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असे सुतोवाच केले आहे. तथापि निवडणुकीचा प्रचार मुख्यमंत्री चौहान, प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर या तिघांच्या सामूहिक नेतृत्वाखाली होईल. तोमर यांची नुकतीच राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीच्या संयोजकपदी निवड करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपी नड्डा हे भाजपाच्या निवडणूक प्रचारावर थेट लक्ष ठेवतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणुकीच्या प्रचारावर लक्ष केंद्रीत करतील. तसेच दोन्ही नेते मिळून तेलंगणा राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. राजस्थानमध्ये विद्यमान सत्ताधारी काँग्रेसकडून भाजपाला कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे भाजपा नेत्यांनी राज्यात जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (२७ जुलै) राजस्थानच्या सिकरमध्ये विविध विकासकामांचे उदघाटन करत असताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

आणखी वाचा >> “…म्हणून राजस्थानमध्येही भाजपाचा पराभव होणार”, अशोक गेहलोत यांचं विधान

केंद्रीय नेतृत्वाने मध्यंतरी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि हरियाणाचे माजी काँग्रेस नेते कुलदीप बिश्नोई यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. या दोघांचीही राजस्थानच्या सहप्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते भुपिंदर यादव यांच्याकडे मध्य प्रदेशचे प्रभारी पद देण्यात आले आहे. तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना सह-प्रभारी करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp may stick to collective leadership in rajasthan even as shivraj chouhan clear face in madhya pradesh kvg