आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मंगळवारी (३ जानेवारी) भाजपाने दिल्लीच्या आपल्या मुख्यालयात अनेक बैठका घेतला. या बैठकांत या निवडणुकीसाठीची रणनीती ठरवण्यात आली. यावेळी भाजपाने ३०३ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विशेष म्हणजे २२ जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरातील प्रभू रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जास्तीत जास्त प्रचार कसा केला जाईल, यावरही या बैठकांत चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा
भाजपाच्या दिल्लीच्या मुख्यालयात मंगळवारी सकाळी एक उच्चस्तरिय बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती, प्रचारमोहीम तसेच वेगवेगळ्या अडचणी यांवर चर्चा झाली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांना घेऊन प्रचार करावा, यावरही या बैठकीत खल झाला. येत्या मार्च-एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे.
बैठकीला महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती
या सकाळच्या बैठकीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविय, भाजपाचे सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे, तरुण चुग यांसह आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा शर्मा आदी नेते उपस्थित होते. पक्षातर्फे सध्या राबवल्या जात असलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी एक उपसमिती स्थापन करण्याचा तसेच एक कॉल सेंटर निर्माण करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.
यासह या बैठकीत कोणत्या मुद्द्यांना घेऊन लोकांत जायला हवे, तसेच भापजाला मिळणारी मते एकत्रित कशी केली जातील, यावरही या बैठकीत चर्चा झाली.
निवडणुकीत नरेंद्र मोदीच केंद्रस्थानी
सूत्रांच्या माहितीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा २०१९ साली नोंदवलेला विक्रम मोडण्याच्या प्रयत्न करणार आहे. मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा ३०३ पेक्षा अधिक जागांवर कसा विजय होईल, तसेच भाजपाला ३७.३६ टक्क्यांपेक्षा अधिक मते कशी मिळतील, यासाठी भाजपाकडून प्रयत्न केला जाणार आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच असणार आहेत. मोदी हे हिंदुत्व, विकास आणि भारताचा जागतिक चेहरा अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्नही या निवडणुकीत केला जाणार आहे.
२२ जानेवारीच्या कार्यक्रमाचे नियोजन
दिल्लीच्याच मुख्यालयात भाजपाच्या नेत्यांची आणखी एक बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जे. पी. नड्डा होते. या बैठकीला प्रत्येक मोठ्या राज्यातील चार ते पाच नेत्यांना आणि छोट्या राज्यांतील दोन नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठीच्या नियोजनावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
प्रत्येक घरी पाच दिवे लावण्याचे आवाहन
प्रभू रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची भाजपाने चांगलीच तयारी केली आहे. त्यासाठी १५ दिवसांचा विशेष कार्यक्रम भाजपाने आखला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी १४ ते २७ जानेवारी या काळात देशातील वेगवेगळ्या भागांतील स्थानिक मंदिरांची साफसफाई करावी, असे या बैठकीत ठरवण्यात आले. २२ जानेवारी रोजी जेव्हा राम मंदिराचे उद्घाटन होईल, तेव्हा देशातील प्रत्येक घरात पाच दिवे लावावेत, असेही भाजपाकडून सांगितले जात आहे. या दिव्यांना भाजपाकडून राम ज्योती असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे २२ जानेवारी हा दिवस दिवाळीसारखा साजरा केला जावा, असे भाजपाकडून आवाहन केले जात आहे.