BJP-RSS coordination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच मुंबई दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी महायुतीच्या आमदारांना संबोधित करताना पाच मुद्दे मांडत त्याची अंमलबजावणी आमदारांनी करावी असे म्हटले. यानंतर आता भाजपाचे वरिष्ठ नेते आणि संघाच्या नेत्यांमध्ये आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे. हिंदुत्वाचा अजेंडा आणि पुढील पाच वर्षांचे नियोजन याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या लोअर परळ येथील संघाच्या कार्यालयात १८ आणि १९ जानेवारी रोजी दोन दिवसांची बैठक आयोजित केली जाणार आहे. द इंडियन एक्स्प्रेसने याबाबत लेख प्रकाशित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, भाजपाचे सर्व मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तसेच नवनियुक्त कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे या बैठकीला उपस्थित राहतील. राज्य मंत्रिमंडळात भाजपाचे १९, शिवसेनेचे (शिंदे) ११ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ९ मंत्री आहेत. मुंबईसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे आव्हान भाजपासमोर आहे. या निवडणुकांसाठी संघाचे सहकार्य मिळावे, अशी भाजपाची अपेक्षा आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “हिंदुत्वासह संघाला अपेक्षित असलेल्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे हा भाजपा आणि संघामधील बैठकीचा मुख्य उद्देश आहे. या महत्त्वाच्या विषयांसह समाज आणि जनतेशी निगडित प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विषयांवरही यावेळी चर्चा केली जाईल.” बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेले अत्याचार, सीमेपलीकडून विनाकागदपत्र होणारे स्थलांतर यांसारख्या इतर काही विषयांवरही या बैठकीत चर्चा केली जाईल.

भाजपाच्या एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितले की, आमच्यापैकी बहुतेक जण संघाच्या मुशीतून आलेले आहेत. संघ आमचा मार्गदर्शक आहे. याआधीही आम्ही संघाशी सल्लामसलत केलेली आहे. आता होणारी बैठक ही आमच्यात योग्य समन्वय राखून पुढील धोरणांविषयी चर्चा करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. भाजपा असो किंवा संघ आमचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे समाजातील शेवटच्या व्यक्तीला सेवा देणे, त्याला विकासाचा लाभ मिळवून देणे. हिंदुत्व हा भाजपा, संघ आणि संबंधित संघटनांचा अविभाज्य घटक आहे.

नागपूरमधील संघाच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ नेत्याने म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शांतपणे काम करतो. कुणाचा तरी विजय किंवा पराभव करणे, अशा छोट्या उद्देशांसाठी संघ काम करत नाही. राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून आपले हित साध्य करण्यासाठी दूरदृष्टीसह संघ काम करत आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्वतःला सामाजिक संघटन म्हणून सांगत असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केलेले आहे. संघाच्या अनेक नेत्यांना भाजपामध्ये पदे दिली गेलेली आहेत. मागच्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४८ पैकी केवळ १७ जागा जिंकता आल्या. संघ आणि भाजपामध्ये समन्वयाची कमतरता असल्यामुळे महायुतीला फटका बसल्याचे बोलले गेले. यानंतर भाजपाच्या नेत्यांनी आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत योग्य समन्वय राखत सत्ता मिळवली. निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस यांनी संघ नेत्यांसमवेत अर्धा डझनभर बैठका घेतल्याचे बोलले जाते. याचा लाभ विधानसभा निवडणुकीत झाला आणि भाजपाने १४९ पैकी १३२ ठिकाणी विजय मिळविला.

विधानसभा निवडणुकीदरम्यान द इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आज त्यांनी (संघ) आमची मदत केली आहे. त्यांच्या मदतीमुळेच आम्ही भारत जोडोचे नरेटिव्ह आणि अराजकतावादी शक्तींना दूर ठेवू शकलो आहोत. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आम्ही समन्वय राखण्यास सुरुवात केली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ministers in maharashtra to discuss core issues with sangh as local body polls loom kvg