भंडारा : भुसावळ मतदारसंघाचे भाजप आमदार, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यांच्या रूपात जिल्ह्याला पुन्हा ‘पार्सल’ पालकमंत्री लाभला आहे. परंपरेनुसार सावकारे हे देखील केवळ ध्वजारोहणासाठीच जिल्ह्यात येतील का, असा प्रश्न राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांना पडला आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमधील तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू होती. दिल्ली-मुंबईत राजकीय वजन असल्याचे भासवणारे जिल्ह्यातील महायुतीतील घटकपक्षांचे नेते पालकमंत्री आपल्या ‘सोयीसवडीचा’ होणार म्हणून सांगत होते. शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर आधीपासूनच स्थानिक पालकमंत्री असावा, यासाठी आग्रही होते. मात्र, जिल्ह्याला मंत्रीपदच मिळाले नसल्याने पुन्हा ‘पार्सल’ पालकमंत्रीच नशिबी आला.
आणखी वाचा-बुलढाणा पालकमंत्री निवडीतही धक्कातंत्र; राष्ट्रवादीची बाजी
पालकमंत्र्यांच्या बाबतीत भंडारा जिल्हा कायमच कमनशिबी राहिला आहे. आजवर बंडू सावरबांधे, नाना पंचबुधे आणि परिणय फुके यांच्या रूपाने स्थानिक पालकमंत्री मिळाले होते. हे अपवाद वगळता जिल्ह्याला बाहेरचेच पालकमंत्री मिळाले. आता जिल्ह्याचा विकास आराखडा मंजूर करताना नवीन पालकमंत्री किती सढळ हस्ते निधी देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भंडारा जिल्ह्याला जवळपासचे पालकमंत्री मिळतील, अशी अपेक्षा होती. वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी अपेक्षा होती. मुंबईस्तरावर तशा हालचाली होतानाही दिसत होत्या. मात्र सावकारे यांचे नाव जाहीर झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. भूसावळ ते भंडारा हे अंतर ४८७.१ किलोमीटर आहे. एवढ्या अंतरावरून सावकारे यांना भंडारा जिल्ह्याचा कारभार पाहावा लागणार आहे.
आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांनी पालकत्व घेतल्याने गडचिरोलीच्या विकासाचा मार्ग सुकर?
जिल्ह्याचा विकास साधण्याचे आव्हान
जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवल्याने जिल्ह्याच्या विकासालाही मर्यादा आल्या आहेत. जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्रिपद मिळाले नसल्याने म्हणावा तसा विकास झालेला नाही. एकीकडे राज्यातील विविध जिल्ह्यातील मतदारसंघांना मंत्रिपदाची संधी मिळत असताना २००९ पासून भंडारा जिल्हा मात्र मंत्रिपदापासून वंचित आहे. आता ५०० किमी अंतरावरून भंडारा जिल्ह्याचा विकास करण्याचे आव्हान नूतन पालकमंत्री संजय सावकारे यांच्यासमक्ष असेल.