सुहास सरदेशमुख
गेल्या १४ वर्षापासून बंद असलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलचा दारुन पराभव झाला. शिवशाही पॅनलचे कृष्णा पाटील यांच्या सर्व २० उमेदवारांचा विजय राजकीय पटलावर लक्षणीय मानला जात आहेत. आमदार बंब हेही हतनूर गटातून पराभूत झाले आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतानाही गंगापूर सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण न करता आल्याच्या रागातून सभासदांनी आमदार बंब यांच्या विरोधातील कौल दिल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा… मंत्रिमंडळ विस्तार आणि निवडणुका लांबणीवर पडल्याने सांगलीत राजकीय खडाखडी
हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक समाजाच्या चेहऱ्याच्या शोधात
दोन वेळा बंद पडलेल्या गंगापूर साखर कारखान्याची निवडणूक झाली. या पूर्वी या कारखान्याचे १४ हजार ६६ मतदार होते. त्यातील अनेक मतदारांचा मृत्यू झाला. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सात हजार ५९८ मतदारांनी विविध मतदार गटात मतदान झाले. ५४ टक्के मतदान झाल्यानंतर सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. आमदार बंब यांच्या विरोधात कौल असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवशाही पॅनलेच सर्व उमेदवार निवडून आल्याचे स्पष्ट झाले. निवडणुकीतील विजयानंतर कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला आमदार बंब यांचा पराभवह राजकारणाची दिशा बदलविणारा असल्याचा दावा आता डोणगावकर समर्थकांकडून केला जात आहे.