नाशिक – जिल्ह्यातील चांदवड-देवळा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भावासाठी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. या मतदारसंघात त्यांनी आपले बंधू भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. कौटुंबिक कलह टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. यातून केवळ हा मतदारसंघच नव्हे तर, जिल्ह्याच्या राजकारणात एकप्रकारे घराणेशाहीची परंपरा पुढे नेली जात आहे.
राज्यातील सर्व मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुकांची धडपड सुरू असताना आणि कुटुंबांमध्ये मतभेद होत असताना आपणास उमेदवारी देऊ नका, यासाठी नेतृत्वाची वारंवार भेट घेणारे आपण एकमेव आमदार असल्याचा दावा डॉ. आहेर यांनी पत्रकार परिषदेत केला. विधानसभेसाठी त्यांचे चुलत बंधू केदा आहेर हे काही महिन्यांपासून तयारीला लागले आहेत. त्यामुळे ही जागा नेमकी कोण लढविणार, याविषयी स्थानिक पातळीवर संभ्रम होता. पक्षाने मुभा दिल्यानंतर हा संभ्रम दूर करण्यासाठी आपण सर्वकाही जाहीर केल्याचे आमदार डॉ. आहेर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – लातूरमधील सर्व मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा
डॉ. राहुल आहेर यांचे वडील माजी आरोग्यमंत्री दिवंगत डॉ. डी. एस. आहेर यांचे राजकारण नाशिकमधून चालत असे. नाशिकमधूनच ते आमदार, खासदार झाले होते. १९९९ च्या युती शासनाच्या काळात त्यांनी आरोग्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुढे डॉ. डी. एस. आहेर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाले. नंतर ते पुन्हा स्वगृही परतले.
डॉ. राहुल आहेर हे नाशिक महानगरपालिकेत नगरसेवकही राहिले आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघातून विधानसभेत पराभूत झाल्यानंतर त्यांनी मूळ गावी म्हणजे देवळा तालुक्यातून राजकारणाचा नवीन अध्याय सुरु केला. तो यशस्वी ठरला. सलग दोनवेळा ते विधानसभेत पोहोचले. याच काळात त्यांचे बंधू केदा आहेर यांची नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि अलीकडेच नाफेडच्या संचालकपदी वर्णी लागली.
हेही वाचा – ‘सुंठे वाचून खोकला गेला’ जानकरांच्या भूमिकेनंतर गंगाखेडमध्ये भाजपला आनंद
आहेर बंधूंची चुलतबहीण हिमगौरी आहेर-आडके यांना भाजपच्या सत्ताकाळात नाशिक महानगरपालिकेत पहिली महिला स्थायी सभापती होण्याचा मान मिळाला. काही वर्षांपूर्वी हिमगौरी यांचे वडील बाळासाहेब आहेर यांनीही महापालिका स्थायी सभापतीपदी तर, आई शोभना आहेर यांनी उपमहापौर म्हणून काम केले होते. देवळा तालुक्यातील राजकारण आहेर कुटुंबियांभोवती फिरते. प्रदीर्घ काळापासून तालुक्यातील बाजार समिती आणि विविध संस्थांवर आहेर बंधूंचे वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागात कमालीचा रोष असताना या विधानसभा मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली होती. महायुतीची सत्ता आणण्यासाठी आमचा सर्वोच्च नेता मुख्यमंत्रिपद त्यागू शकतो, तेव्हा त्या नेत्यासाठी आमदारकीचा त्याग करण्याकरिता विचार करण्याची गरज नाही, असे डॉ. आहेर यांनी नमूद केले.