सोलापूर : पाच दशकांपूर्वी लक्षभोजनामुळे गाजलेल्या शाही विवाहानंतर ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहि पाटील यांचे नातू आणि भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र विश्वतेजसिंह यांचा शाही विवाह सोहळा अकलूजमध्ये लाखो जनसमुदायाच्या साक्षीने मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या माध्यमातून मोहिते- पाटील यांनी शक्तिप्रदर्शन केले.
यावेळी अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांसह विविध राज घराण्यांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा संदेश पाठवून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले आहेत. मुंबईत झालेल्या स्वागत सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींनी हजेरी लावली होती. हा विवाह सोहळा आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे भाजपमधील भवितव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडांगणावर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र विश्वतेजसिंह यांचा शाही विवाह उदयसिंह सरनाईक (चिखली, जि. वाशीम) यांची कन्या शिवांतिका यांच्याशी संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत खासदार शाहू महाराज, सातारचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, कल्पनाराजे भोसले, नागपूरचे छत्रपती संग्रामसिंहराजे भोसले यांच्यासह इतरांनी उपस्थिती लावली होती.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यटन व खनिकर्ममंत्री शंभूराज देसाई, क्रीडा राज्यमंत्री दत्ता भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदींसह अनेक आजी-माजी आमदार-खासदारांचीही उपस्थिती होती. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. या शाही सोहळ्यात एक लाखापेक्षा अधिक जनसमुदाय हजर होता.
५३ वर्षांपूर्वी १९७१ साली सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे सुपुत्र विजयसिंह यांचा शाही विवाह सोहळा ‘लक्षभोजना’मुळे संपूर्ण देशात गाजला होता. त्यानंतर १९९५ साली विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांचा विवाह सोहळाही मोठ्या थाटात झाला होता. त्यानंतर मोहिते पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील विश्वतेजसिंह यांचाही विवाह सोहळा तेवढ्याच थाटामाटात पार पडला. विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांचे सुपुत्र रणजितसिंह आणि नातू विश्वतेजसिंह या तिघांच्याही विवाह सोहळ्यात शरद पवार आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी हजेरी लावल्याचा योगायोग पाहायला मिळाला.
मोदी-शहांच्या शुभेच्छा
या विवाह सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी नवदाम्पत्याला आयुष्यभरासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा पाठविल्या. दुसरीकडे मुंबईत आयोजिलेल्या स्वागत सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सुरेश प्रभू यांच्यासह अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली होती.
विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी पाठविलेले शुभेच्छा संदेश आणि स्वागत सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह भाजपसह अनेक मंत्र्यांनी लावलेली हजेरी, ही आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यादृष्टीने जमेची बाजू मानली जाते. त्याबाबतची पार्श्वभूमी अशी की, मागील पाच वर्षें भाजपसोबत राहिलेले मोहिते-पाटील कुटुंबीय, आमदार रणजितसिंह यांचा एकमेव अपवाद वगळता गेल्या लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात सक्रिय आहेत. त्याचा मोठा फटका माढा व सोलापूर लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत माढा भागात भाजपला बसला आहे. त्याचा राग भाजपने मोहिते-पाटील कुटुंबीयांवर काढला आहे. यात आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी तीन महिन्यांपूर्वी त्यांना पक्षशिस्त भंगाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र अद्यापि त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
दुसरीकडे मोहिते-पाटील यांच्या अडचणी वाढण्याच्या दृष्टीने सोलापूरचे पालकमंत्रिपद जयकुमार गोरे यांना देण्यात आले आहे. गोरे हे सातत्याने मोहिते-पाटील यांच्या माळशिरस तालुक्यात भेटी देऊन त्यांच्या विरोधकांना बळ देत आहेत. माळशिरस विधानसभा निवडणुकीत मूळ संघ परिवारातील राम सातपुते यांचा थोडक्या मतांनी झालेला पराभव भाजपच्या पचनी पडला नाही, असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी होत असताना कारवाई थंड दिसते.
दुसरीकडे रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये माळशिरसचा अपवाद वगळता राज्यात सक्रिय आहेत. पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात उल्लेखनीय सहयोग दिल्याबद्दल त्यांना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रशस्तीपत्र प्रदान केले आहे. या पार्श्वभूमीवर रणजितसिंह यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्याकडेही राजकीय नजरेतून पाहिले असता त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी पाठविलेले शुभेच्छा संदेश आणि मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आदींनी स्वागत सोहळ्यात दर्शविलेला सहभाग रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यादृष्टीने जमेची बाजू मानली जाते.