Suresh Khade Miraj Assembly Election 2024 : मिरज हा राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा आणि भाजपचा हक्काचा मतदारसंघ. मिरजेवर असलेली खाडे यांची पकड आणि असंघटित विरोधक ही त्यांची बलस्थाने यंदाही खाडेंच्या विजयाचा मंत्र ठरण्याची चिन्हे असतानाच त्यांना पक्षांतर्गत होऊ लागलेल्या विरोधाने यात नवे आव्हान निर्माण केले आहे.

मंत्री खाडे यांनी २००४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जतमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलवले. यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत मिरज मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर खाडे यांनी आपला मोर्चा मिरजेकडे वळविला. २००९मध्ये झालेल्या दंगलीचा राजकीय लाभ खाडे यांना मिळाला. २००९पासून झालेल्या सलग तीन निवडणुकीत मिरजेत भाजपकडून ते विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत.

हेही वाचा >>> Dispute in Mahayuti: ‘चोराच्या उलट्या बोंबा’, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया

भाजपचे सदस्य असल्याने मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. याचा फायदा घेत त्यांनी मिरज मतदार संघात विकासकामांचा मोठ्या प्रमाणावर निधी आणला. रस्ते, समाज मंदिरे, जलजीवन आदी कामे मंजूर करून घेतली. आता मतदारसंघात एकाही विकासकामाची मागणी नसल्याचा त्यांचा दावा आहे. गावपातळीवर त्यांचा संपर्क मोठा आहे. याचबरोबर मंत्रीपद असल्याने मतदारसंघात दुर्लक्ष होऊ नये यासाठी त्यांच्या पत्नी सुमनताई खाडे आणि चिरंजीव सुशांत खाडे यांनी सातत्याने संपर्क ठेवला आहे. याचा फायदा या निवडणुकीत घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे संजयकाका पाटील यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळाले पण मागील तुलनेत आकडेवारीत घट झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेना हे पक्ष हा मतदारसंघ जिंकण्याची स्वप्न पाहू लागले आहेत.

दुसरीकडे खाडे यांचे एकेकाळचे निकटचे सहकारी असलेले प्रा. मोहन वनखंडे हेही इच्छुक आहेत. भाजपच्या वतीने खाडे यांनी दहीहंडीचा कार्यक्रम घेतल्यानंतर वनखंडे यांनीही भाजप-जनसुराज्य आणि महायुतीच्या वतीने दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. जर भाजपने मंत्री खाडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली तर जनसुराज्यच्या वतीने मैत्रीपूर्ण लढतीची तयारीही सुरू आहे. यासाठी त्यांना जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. मविआत एकमत झाले तर अन्य इच्छुक बंडखोरी करणार का? वनखंडेची उमेदवारी असणार का? असेल तर लोकसभेवेळचा सांगली पॅटर्न मिरजेत दिसणार का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मविआच्या घटक पक्षांचा दावा

महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मिरजेवर दावा केला असून यावेळची संधी गमावली तर पुन्हा संधी नाही यादृष्टीने इच्छुकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीतून जिल्हा बँकेचे माजी संचालक बाळासाहेब वनमोरे, हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे, चंद्रकात सांगलीकर, धनराज सातपुते, सिध्दार्थ जाधव, तानाजी सातपुते आदी इच्छुक प्रयत्नशील असून काहींनी प्रचारही सुरू केला आहे.