भंडारा : जिल्ह्यातील भंडारा आणि तुमसर या दोन विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, साकोली विधानसभेत आमदार नाना पटोले यांना तुल्यबळ लढत देऊ शकेल, असा उमेदवार भाजपला अद्यापतरी गवसलेला नसल्याचे चित्र आहे. विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके हे साकोली विधानसभेत त्यांचे वर्चस्व कायम राखण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आपल्या मर्जीतील उमेदवार देण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असल्याचे बोलले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> राजेंद्र शिंगणे यांची ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका!; घड्याळ की तुतारी? विरोधकांसह मित्रपक्षही संभ्रमात

साकोली विधानसभा क्षेत्रात साकोली, लाखनी आणि लाखांदूर हे तीन तालुके येतात. येथे भाजपचा वरचष्मा आहे. २००९ मध्ये नाना पटोले या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बाळा काशीवार या मतदारसंघातून तब्बल २५ हजार ४८९ च्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये पटोले यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली आणि भाजपचे डॉ. परिणय फूके यांना पराभूत केले. तेव्हापासून साकोली मतदारसंघ कायम चर्चेत राहतो तो पटोले आणि फुके यांच्यातील वर्चस्व वादामुळे. ही जागा दोघांसाठीही प्रतिष्ठेची मानली जाते. २०१९ ची निवडणूक गाजली होती ती ही यामुळेच.

हेही वाचा >>> भाजपचे ११० उमेदवार निश्चित, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय; पहिली यादी उद्या

येथून लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी फुके यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधामुळे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. फुके यांच्या कुटील कारस्थानामुळे लोकसभेत सुनील मेंढेंचा पराभव झाला, असे बोलले जाते. मेंढे यांना फुके यांच्या कर्मभूमीतच सर्वाधिक मतांचा फटका बसला होता. निकालानंतर हे भाजपश्रेष्ठींच्याही लक्षात आले. विधानसभा निवडणुकीत फुके साकोली मतदारसंघातून लढतील, असे वाटत असतानाच त्यांनी मागच्या दारातून विधिमंडळात प्रवेश केला आणि विधान परिषदेचे आमदार झाले. आता फुके या मतदारसंघातील आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी धडपडत आहेत. आपल्या मर्जीतील उमेदवारला उमेदवारी मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. भाजप निरीक्षकांच्या सर्वेक्षणात माजी आमदार बाळा काशिवार आणि सोमदत्त करंजेकर यांची नावे पुढे आली आहेत. मात्र, नानांना पराभूत करण्यासाठी भाजपचा उमेदवार हा कुणबीच हवा, असा अट्टहास करीत फुके यांनी त्यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपश्रेष्ठींकडून त्यांचा अट्टहास पूर्ण केला जातो की नाही, नानांच्या विरोधात महायुती येथे कोणता उमेदवार देणार, हे लवकर कळेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mlc parinay phuke trying to maintain his dominance in sakoli assembly print politics news zws