भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदार ब्रिजभूषण सिंह हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारापासून लांब राहिलेले दिसत आहेत. महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर ब्रिजभूषण सिंह अडचणीत सापडले आहेत. मागच्या दहा दिवसांपासून सिंह स्वतःच्या गोंडा जिल्ह्यातही प्रचारासाठी उतरले नसल्याचे दिसते. उत्तर प्रदेशात होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपाने राज्यातील सर्व खासदार, आमदार यांना प्रचाराची जबाबदारी दिली आहे. जाहीर सभा, घरोघरी प्रचार करण्यासाठी भाजपाचे लोकप्रतिनिधी मैदानात उतरले असताना ब्रिजभूषण सिंह मात्र प्रचारापासून दूर आहेत, अशी माहिती भाजपामधील सूत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी पुढे सांगितले की, कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांचे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. २५ एप्रिल रोजी त्यांनी लखनऊ येथील पक्षाच्या मुख्यालयात अवध क्षेत्रातील जिल्ह्यांच्या आढावा बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले.

ब्रिजभूषण सध्या प्रचारापासून लांब राहिले असले तरी त्यांनी मंगळवारी एक व्हिडीओ संदेश प्रसारित करून गोंडा, बाहरैच आणि बलरामपूर जिल्ह्यांतील मतदारांना आवाहन केले की, त्यांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान करावे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण म्हणाले की, माझ्याविरोधात कटकारस्थान रचले जात असून सध्या कठीण प्रसंगातून मी जात आहे, त्यामुळे मतदारांना थेट भेटता येत नाही. भाजपा मुख्यालयातून सर्व खासदारांना मतदारांमध्ये जाऊन प्रचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण ब्रिजभूषण त्याला अपवाद आहेत. बाहरैच जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ब्रिजभूषण यांना प्रचार करण्यासाठी येण्याचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. सिंह यांचे काही समर्थक भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत, पण त्यांचाही प्रचार करण्यासाठी ब्रिजभूषण उतरले नाहीत.

गोंडा जिल्ह्यात मात्र ब्रिजभूषण यांनी व्यवस्थित प्रचार केला. तेथील कार्यकर्त्यांनाही ते नियमित भेटत आहेत. ३० एप्रिल रोजी, ब्रिजभूषण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाचे त्यांच्या कॉलेज कॅम्पसमधील एलसीडी स्क्रीनवर प्रसारण केले. त्याच दिवशी अयोध्या आणि हस्तिनापूर (नेपाळ) येतील काही साधू मंडळींनी त्यांची भेट घेतली. सध्या कुस्तीपटूंसोबत चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर साधूंनी ब्रिजभूषण सिंह यांना आपला पाठिंबा दर्शविला. ब्रिजभूषण यांना पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरवर बसण्याची तयारीदेखील या साधूंनी दाखविली.

राजकारणाव्यतिरिक्त ब्रिजभूषण यांची गोंडा येथे दैनंदिन कामे सुरू आहेतच. ते रोज सकाळी गोशाळेला भेट देतात. आखाड्याच्या भेटी, समर्थकांच्या कौटुंबिक सोहळ्याला हजेरी लावणे, अशा प्रकारचे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. ‘द इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राशी बोलताना खासदार ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, सध्या माझ्यावर होत असलेले आरोप आणि वादाच्या पार्श्वभूमीवर मी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक प्रचार आणि राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण मी मतदारांना आवाहन करण्यासाठी निवेदन दिले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp brij bhushan singh missing out from up urban body polls campaign after allegations of sexual exploitation kvg