अविनाश कवठेकर
पुणे : उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आव्हान देणारे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या नियोजित पुणे दौऱ्याला तूर्त विरोध न करण्याची भूमिका शहर मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. भारतीय जनता पक्षाबरोबरची वाढती जवळीक, युतीची चर्चा, या पार्श्वभूमीवर तूर्त हा विषय नको, तेव्हाचे तेव्हा पाहू, अशी सावध भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
ब्रिजभूषण सिंह उत्तर प्रदेशातल्या कैसरगंज येथील भाजपचे खासदार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. पुण्यात २० ते २५ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पर्धा भरविली आहे. त्यासाठी ब्रिजभूषण सिंह पुण्यात येणार आहेत. पुण्याच्या त्यांचा दौऱ्याला मनसेकडून विरोध होण्याची शक्यता होती. मात्र मनसेने तूर्त या दौऱ्याला विरोध न करण्याची भूमिका घेतली आहे.
मनसेने ऐनवेळी भूमिकेत का बदल केला, याची चर्चा सुरू झाली आहे. हा विषय सोडून देता येणार नाही, मात्र त्यावर सध्या न बोलणेच योग्य आहे, असा सावध पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला असून या संदर्भात कोणी काही मतप्रदर्शन करू नये, असा सूचनावजा आदेशच शहर पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्या दौऱ्याला विरोध नाही असे नाही पण, त्या वेळी काय ते ठरविले जाईल, असा दावा करण्यात आल्याने मनसे विरोधात ब्रिजभूषण सिंह यांच्यात स्पर्धेच्या निमित्ताने नुरा कुस्तीचा सामना रंगण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरे हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटही घेणार होते.
हेही वाचा : शहाजी बापू म्हणतात, आम्ही भाजपचे मांजर मारले म्हणून गुवाहाटीला जाऊन प्रायश्चित घेतले
राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात विशेषत: उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेतली होती. मनसेच्या स्थापनेनंतर उत्तर भारतीयांविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. त्याचे पडसाद अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर दिसून आले. राज यांनी आधी समस्त उत्तर भारतीयांची बिनशर्त माफी मागावी. अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण सिंह यांनी दिला होता. अयोध्या दौऱ्याला होत असलेला वाढता विरोध आणि प्रकृतीच्या कारणास्तव जून मध्ये होणारा हा दौरा तूर्त रद्द करण्याची घोषणा राज यांनी केली होती. भविष्यात अयोध्या दौरा केला जाईल, असेही राज यांनी जाहीर केले होते. मात्र मनसेकडून विरोध न करण्याची भूमिका का घेण्यात आली, या बाबतच्या कारणांची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : एस.एम.जोशी सभागृहाची दुर्दशा काँग्रेसने फलक-रोषणाईने झाकली!
राज्यातील सत्ता संघर्षानंतर राज ठाकरे यांची भूमिका भाजपला पूरक राहिली आहे. भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यात सातत्याने भेटी होत आहेत. सत्तास्थापनेसाठी भाजपबरोबर हातमिळवणी केलेल्या एकनाथ शिंदे गटाबरोबरही मनसेची जवळीक वाढत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मनसे युतीमध्ये येईल, अशी चर्चाही होत आहे. अयोध्या दौरा मनसेला अडकविण्यासाठीचा सापळा असल्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे पुन्हा या सापळ्यात मनसेला अडकायचे नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीत एकमेकांना दुखवायचेही नाही आणि जास्त जवळही जायचे नाही, अशी रणनीती मनसेची आहे. निवडणुकीनंतरची सत्ता समीकरणे जुळविण्यासाठी ही भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळेच ब्रिजभूषण सिंह दौऱ्याला विरोध नको असेच मनसेला वाटत आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत मनसे भाजपच्या ताटाखालील मांजर होत आहे का, अशी चर्चा या निमित्ताने मनसे कार्यकर्त्यांमध्येच दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
हेही वाचा : अंबादास दानवे : संघटनेस आकार देणारा आक्रमक नेता
‘खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या दौऱ्याबाबत सध्या काही भाष्य करता येणार नाही,’ अशी प्रतिक्रिया मनसे नेते अनिल शिदोरे यांनी दिली. तर ब्रिजभूषण सिंह यांचा दौरा निश्चित होऊ द्या, काय करायचे हे तेव्हा ठरविले जाईल. वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करून योग्य ती भूमिका घेतली जाईल, असे मनसेचे राज्य प्रवक्ता हेमंत संभूस यांनी सांगितले.आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता मराठीचा मुद्दा आणि उत्तर भारतीयांविरोधातील मुद्दा सोडता येणार नाही. हा विषय लावून धरला तर महापालिका निवडणुकीत त्याचा काही प्रमाणात निश्चित फायदा होईल, असा एक मतप्रवाहही मनसेत आहे. मात्र हा विषय तूर्त नको अशी सावध भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्येच संभ्रमावस्था वाढली आहे.