नांदेड : लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे उभारण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे स्मृती-भवनाच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपच्या नांदेड आणि लातूर मतदारसंघांच्या खासदारद्वयांनी माळाकोळीजवळच्या माळेगाव यात्रा परिसरात काँग्रेसचे दिवंगत नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याच्या कामात लक्ष घातले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माळेगाव येथे खंडोबा देवस्थान असून दरवर्षी या ठिकाणी दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा भरविली जाते. देशमुख परिवाराचे श्रद्धास्थान म्हणूनही या गावाची ओळख आहे. येथील यात्रा नव्या वर्षाच्या दुसर्‍या आठवड्यात भरणार असून यात्रेच्या पूर्वतयारीसाठी स्थानिक आमदार श्यामसुंदर शिंदे आणि प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात एक बैठक झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर आणि सुधाकर श्रृंगारे या खासदारद्वयांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करून शुक्रवारी स्वतंत्र बैठक घेतली.

हेही वाचा – गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी लोकसभा निवडणुकीत अशी खबरदारी

वरील बैठकीचे वृत्त शासनाच्या प्रसिद्धी खात्याच्या यंत्रणेकडून जारी झाले नाही. खासदर चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयातून या बैठकीची माहिती देणारे एक वृत्त जारी करण्यात आले. त्यात नंतर सुधारणा करण्यात आली. या सुधारित वृत्ताद्वारे विलासरावांचा पुतळा उभारण्याची माहिती वृत्तपत्रांना देण्यात आली. माळेगाव यात्रा परिसराचा विकास करण्यासाठी विलासरावांनी दिलेल्या योगदानाची माहितीही देण्यात आली. विलासरावांची स्मृती जपण्यासाठी यात्रा परिसरात त्यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प जाहीर करतानाच खासदार चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करण्याची संधी साधली. त्याचवेळी विलासरावांच्या पुतळ्याची घोषणा करणार्‍या भाजपच्या दोन विद्यमान खासदारांनी माळाकोळी येथील गोपीनाथ मुंडे स्मृती-भवनाच्या कामासाठी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची मदत केली नसल्याची माहितीही समोर आली.

विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची पक्षीय राजकारणापलीकडची मैत्री महाराष्ट्रात सुपरिचित होती. राज्यातून केंद्रीय राजकारणात गेलेले हे दोन नेते गेल्या दशकात पावणेदोन वर्षांच्या अंतराने काळाच्या पडद्याआड गेले. मुंडे यांच्या निधनानंतर माळाकोळी गावातील काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावात स्मृती-भवन उभारण्याचे काम हाती घेतले. या कामासाठी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी सर्वप्रथम १० लाखांची मदत केली होती. त्यानंतर विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांनीही मोठी आर्थिक मदत केली. या भवनात एका मजल्यावर ग्रंथालय तर दुसर्‍या मजल्यावर मुंडे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. तसेच भवनाच्या परिसरात मुंडे यांचा पुतळाही उभारण्याचे प्रस्तावित आहे.

हेही वाचा – अजित पवारांची भविष्यवाणी खरी ठरणार का ?

संबंधित कार्यकर्त्यांनी लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड तसेच विद्यमान खासदर श्रृंगारे यांच्याकडे भवनाच्या कामासाठी निधी मागितला होता. परंतु आजपर्यंत त्यांनी मदत केली नाही. नांदेडच्या भाजप खासदारांनी मदतीचे आश्वासन दिले आहे, पण त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही, असे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर भाजपच्या दोन खासदारांनी काँग्रेसच्या दिवंगत नेत्याच्या पुतळ्याच्या उभारणीत घेतलेला पुढाकार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp initiative for vilasrao deshmukh statue gopinath munde memorial building neglected print politics news ssb