भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मोईत्रा लाच घेतात, असा दावा दुबे यांनी केला. तर मोईत्रा यांनी दुबे यांनी केलेला आरोप फेटाळून लावला आहे. या प्रकरणावर तृणमूल काँग्रेसने मात्र अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे नेमके प्रकरण काय आहे, हे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप

दुबे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना रविवारी एक पत्र लिहिले. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी मोईत्रा यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी लाच घेतली आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी एका समितीची स्थापना करावी तसेच या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मोईत्रा यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली.

हेही वाचा : ‘काँग्रेस घराणेशाहीवर चालणारा पक्ष, भारतात ओबामांसारखा नेता होणे अशक्य’; शशी थरूर यांचे राहुल गांधीबाबत मोठे विधान

माझ्यावर कारवाई करण्याआधी दुबे यांच्यावरील आरोपांची चौकशी करा- मोईत्रा

मोईत्रा यांनी मात्र दुबे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्यावरील आरोपांची चौकशी करण्याआधी दुबे यांच्याविरोधीतील विशेषाधिकाराच्या उल्लंघनाच्या आरोपांची चौकशी करावी, असे मोईत्रा म्हणाल्या आहेत. या वर्षाच्या मार्च महिन्यात मोईत्रा यांनी दुबे यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली होती. दुबे यांची एमबीए आणि पीएचडीची पदवी ही बनावट आहे, अशा दावा मोईत्रा यांनी केला होता.

विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी करावी- सुवेंदू अधिकारी

मोईत्रा यांच्यावरील आरोपानंतर पश्चिम बंगालमधील भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मोईत्रा यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनीदेखील मोईत्रा यांच्यावर टीका केली आहे. “मोईत्रा यांच्याविरोधातील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. संसदेच्या विशेषाधिकार समितीमार्फत या प्रकरणाची तत्काळ चौकशी करणे गरजेचे आहे,” असे अधिकारी म्हणाले.

तृणमूल काँग्रेसने कोणतीही भूमिका घेतलेली नाही

तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाने मात्र या प्रकरणावर अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. या प्रकरणावर तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही सध्या या प्रकरणावर पुढे काय होते, याची वाट पाहात आहोत. मोईत्रा या योग्य आणि आवश्यक ती पावले उचलत आहेत. सध्या या परिस्थितीकडे आमचे बारिक लक्ष आहे,” असे मत या नेत्याने व्यक्त केले. तर सीपीआय (एम) या पक्षाने मात्र मोईत्रा यांची पाठराखण केली आहे. “मोईत्रा यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांसदर्भात चौकशी करण्यात आल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही. मात्र मोईत्रा यांनी नेहमीच भाजपाविरोधात भूमिका घेतलेली आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. याच कारणामुळे त्यांना कदाचित लक्ष केले जात असावे,” असे सीपीआय (एम) पक्षाचे नेते सुजान चक्रवर्ती म्हणाले.

हेही वाचा : Telangana : कल्याणकारी योजना विरुद्ध बेरोजगारी-लाचखोरी; तेलंगणच्या जनतेसमोर काय आहेत पर्याय?

मोईत्र यांनी तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर खात्याला केले होते अनफॉलो

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मोईत्रा यांचे तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाशी सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत. गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यात मोईत्रा यांनी काली देवीबद्दल एक विधान केले होते. या विधानानंतर पश्चिम बंगालमध्ये वाद निर्माण झाला होता. मोईत्रा यांच्या विधानामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, असा दावा भाजपाने तेव्हा केला होता. भाजपाचा हा दावा तेव्हा मोईत्रा यांनी फेटाळला होता. तृणमूल काँग्रेसने मात्र मोईत्रा यांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक आहे. पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर मोईत्रा यांनी तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर खात्याला अनफॉलो केले होते.

ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली होती नाराजी

डिसेंबर २०२१ साली ममता बॅनर्जी यांनी कृष्णानगरमधील गटबाजीवर मोईत्रा यांच्यावर भर सभेत नाराजी व्यक्त केली होती. “महुआ मला तुला स्पष्टपणे काही सांगायचे आहे. कोण कोणाच्या विरोधात आहे, याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही. मात्र जेव्हा निवडणूक असते तेव्हा कोण निवडणूक लढवेल आणि कोण नाही, हे पक्षच ठरवेल. पक्षाच्या निर्णयावर कोणाला आक्षेप नकोय,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp nishikant dubey alleges tmc leader mahua moitra take bribes to ask questions in parliament prd
Show comments