BJP MP Pratap Sarangi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर काँग्रेसने चांगलीच आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. तसेच इंडिया आघाडीच्या काही खासदारांनी संसद परिसरातही आंदोलन केलं. मात्र, यावेळी भाजपा आणि इंडिया आघाडीचे खासदार आमने-सामने आल्यामुळे राजकारण चांगलंच तापलं. यामध्ये भाजपा आणि इंडिया आघाडीच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामध्ये भाजपाचे दोन खासदार जखमी झाल्याचा आरोप करत या प्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संसदेच्या गेटवर झालेल्या धक्काबुक्कीत भाजपाचे ओडिशातील खासदार प्रताप चंद्र सारंगी आणि उत्तर प्रदेशातील फारुखाबादचे खासदार मुकेश राजपूत हे जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही खासदारांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर आरोप करणारे खासदार प्रताप चंद्र सारंगी आणि खासदार मुकेश राजपूत कोण आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
प्रताप चंद्र सारंगी कोण आहेत?
प्रताप चंद्र सारंगी हे भारतीय जनता पक्षाचे खासदार असून ते दोनदा लोकसभेला निवडून आलेले आहेत. दरम्यान प्रताप चंद्र सारंगी हे २०१९ मध्ये चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले होते. तेव्हा त्यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्याच्या साध्या घरात एक साधी बॅग पॅक केल्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. प्रताप चंद्र सारंगी यांना ओडिशात स्पष्टवक्ते म्हणून ओळखलं जातं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रताप चंद्र सारंगी यांनी दोन दिग्गजांचा पराभव केला होता. रवींद्र कुमार जेना आणि तत्कालीन राज्य काँग्रेस प्रमुख निरंजन पटनायक यांचे पुत्र नवज्योती पटनायक यांचा पराभव केला होता. चंद्र सारंगी यांनी १२ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.
पाच वर्षांनंतर त्यांनी बीजेडीमध्ये सामील झालेल्या त्यांच्या माजी पक्ष सहकारी लेखश्री सामंतसिंहर आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीकांत जेना यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. दरम्यान, २०२४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात सारंगी यांनी ४५.५ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि ४.३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केलेली आहे. पेन्शन आणि शेती हे त्यांच्या उत्पन्नाचं स्रोत असून त्यांच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत. १९९९ मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांना जाळल्याची घटना घडली होती. तेव्हा प्रताप चंद्र सारंगी हे एका संघटनेचे राज्य अध्यक्ष होते आणि त्यांनी या प्रकरणात साक्षीदार म्हणून साक्ष दिली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की, मुख्य आरोपी दारा सिंहचा बजरंग दलाशी संबंध नव्हता. सारंगी हे राज्य विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ सदस्यही होते.
२००२ मध्ये बजरंग दलासह काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी ओडिसामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा दंगल, जाळपोळ, हल्ला आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली प्रताप चंद्र सारंगी यांना ओडिशा पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, खासदार होण्यापूर्वी सारंगी दोन वेळा आमदार देखील होते. २००४ मध्ये ते भाजपाचे उमेदवार म्हणून निवडून आले आणि नंतर २००९ मध्ये बालासोर लोकसभा मतदारसंघांत येणाऱ्या निलगिरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते.
कोण आहेत मुकेश राजपूत?
खासदार मुकेश राजपूत हे उत्तर प्रदेशातील फारुखाबाद मतदारसंघाचे भाजपाचे खासदार आहेत. ते फारुखाबाद येथून तीन वेळा खासदार राहिलेले आहेत. मुकेश राजपूत हे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी निवडलेल्या राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात. माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचे निकटवर्तीय म्हणून मुकेश राजपूत यांना ओळखलं जातं. राजपूत यांनी २००० ते २०१२ दरम्यान दोनदा फरुखाबादचे जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. २०१४ मध्ये चौथ्या क्रमांकावर असलेले माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांचा पराभव करून राजपूत एक जायंट किलर ठरले होते. पाच वर्षांनंतर २०१९ मध्ये राजपूत यांनी बसपा उमेदवार मनोज अग्रवाल आणि खुर्शीद यांचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा दुसरे उपविजेते ठरले. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राजपूत पुन्हा विजयी झाले आहेत. यावेळी त्यांनी सपाचे नवल किशोर शाक्य यांचा दोन हजार मताधिक्यांनी पराभव केला. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, राजपूत यांच्यावर कोणताही फौजदारी खटला नाही आणि त्यांच्याकडे १.६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि ७.८ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. संसदेत त्यांनी स्थानिक क्षेत्र विकास योजना आणि कृषी स्थायी समिती यांसारख्या अनेक समित्यांचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे.