संजीव कुळकर्णी
नांदेड : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही आमदारांविरूद्ध ठिकठिकाणी रोष व्यक्त होत असताना, याच गटात सहभागी असलेले सेनेचे नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या रक्षणाचा विडा भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उचलला आहे. कल्याणकर यांना आम्ही धक्काही लागू देणार नाही, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे समर्थकांना बजावले. मुंबईमध्ये दोन दिवस भेटीगाठी करून खा.चिखलीकर शनिवारी सकाळी नांदेडमध्ये परत आले. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी आणि त्यांचे नांदेडमधील संभाव्य पडसाद यावर त्यांनी मतप्रदर्शन केले.
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी असलेल्या काही आमदारांच्या निषेधार्थ ठिकठिकाणी रोष व्यक्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी कोणतीही कृती केलेली नसली, तरी पक्षातून त्यांच्या समर्थनार्थ कोणीही पुढे आलेले नाही; पण भाजप खासदाराने कल्याणकर यांच्या राजकीय कृतीचे समर्थन करताना, शिंदे यांच्या बंडाला आपल्या पक्षाची साथ असल्याचेही सूचित केले.
बालाजी कल्याणकर यांचे निवासस्थान आणि कार्यालय शहरातल्या तरोडा खुर्द भागात एकाच टोलेजंग इमारतीत आहे. आमदारपदी स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी निवासी इमारतीच्या खालच्या मजल्यावर आपले संपर्क कार्यालय निर्माण केले. गेल्या मंगळवारपासून तेथे पोलीस बंदोबस्त आहे. कल्याणकरांचा शिंदे गटातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी त्यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली; पण हल्ला करणे किंवा निदर्शने हा मार्ग त्यांनी आतापर्यंत टाळला आहे. भाजप खासदार चिखलीकर यांनी शनिवारी त्यांच्या कृतीचे समर्थन केले. २०१९ साली कल्याणकर हे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार होते. त्यांच्या विजयामध्ये भाजपचेही मोठे योगदान राहिले, असे नमूद करून चिखलीकर यांनी पुढील राजकीय घडामोडींमध्ये कल्याणकरांचे रक्षण करण्याची जबाबदारीही स्वीकारली. तसेच त्यांच्या सध्याच्या भूमिकेचेही समर्थन केले.
शिवसेनेतील बंडाशी भाजपचा काहीही संबंध नाही, असे चिखलीकर यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार पुरेशा संख्याबळासह आमच्यासोबत आले तर राज्यात देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली. खा.चिखलीकर मुंबईहून येथे परतले असले, तरी भाजपचे आमदार मुंबईतच थांबले आहेत. येणार्या नव्या सरकारमध्ये नांदेड जिल्ह्यातून कोणाला स्थान द्यायचे किंवा नाही, याचा निर्णय पक्षनेते घेतील असे चिखलीकर यांनी एका प्रश्नावर सांगितले.