भाजपाचे खासदार रमेश बिधुरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी संसदेत बोलताना बहुजन समाज पार्टीचे (बसपा) खासदार दानिश अली यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. बिधुरी यांनी दानिश अली यांचा मुल्ला, दहशतवादी असा उल्लेख केला होता. याच प्रकरणाची चौकशी संसदेच्या विशेषाधिकार समितीकडून केली जात आहे. या चौकशीअंतर्गत विशेषाधिकार समितीने त्यांना बोलावले होते. मात्र नियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी येऊ शकत नसल्याचे सांगत बिधुरी चौकशीला हजर राहिलेले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रमेश बिधुरी यांनी लिहिले पत्र

याबाबत लोकसभेच्या सचिवालयाने अधिक माहिती दिली आहे. दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी यांनी संसदेच्या विशेषाधिकार समितीपुढे तोंडी पुरावे दिले आहेत, असे सचिवालयाने सांगितले आहे. बिधुरी यांनी विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षांना एक पत्र लिहून सध्या उपस्थित राहणार नसल्याचे कळवले होते. तसेच पुढील तारखेला मी चौकशीसाठी उपस्थित राहीन, असेही बिधुरी यांनी या पत्राद्वारे सांगितले आहे. पुढील सुनावणीस विशेषाधिकार समिती बिधुरी, दानिश अली यांनी दिलेल्या पुराव्यांचे तसेच विरोधकांनी लिहिलेल्या पत्रांचे मुल्यमापन करण्याची शक्यता आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी बिधुरी यांना अशा प्रकारचे विधान करण्यास उद्युक्त करण्यात आल्याचा आरोप केलेला आहे. तसे पत्रही दुबे यांनी लिहिलेले आहे. या पत्राचेही मुल्यमापन विशेषाधिकार समिती करणार आहे.

रमेश बिधुरी सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर

रमेश बिधुरी यांच्याकडे राजस्थानमधील टोंक जिल्ह्याचे प्रभारीपद सोपवण्यात आलेले आहे. राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. त्यामुळे बिधुरी सध्या टोंक जिल्ह्यात मुक्काम ठोकून आहेत. याबाबत इंडियन एक्स्प्रेसने त्यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला. “मी ९ ते ११ ऑक्टोबर असे एकूण तीन दिवस राजस्थानमध्ये असणार आहे. हा माझा नियोजित दौरा होता. त्यामुळे मी सध्या राजस्थानमध्ये आहे,” अशी प्रतिक्रिया बिधुरी यांनी दिली.

बिधुरी यांची राजकीय कारकीर्द

बिधुरी तीनदा आमदार, दोन वेळा खासदार

बिधुरी हे दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. याआधी ते तीन वेळा दिल्लीमधून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ते तुघलकाबाद येथील एका प्रतिष्ठित कुटुंबातून येतात. गेल्या अनेक दशकांपासून त्यांचे कुटुंबीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. तुघलकाबाद परिसराच्या विकासात बिधुरी यांच्या कुटुंबीयांनी मोठे योगदान दिलेले आहे. त्यांनी १९९३ साली दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळवला. ही निवडणूक त्यांनी तुघलकाबाद या मतदारसंघातून लढवली होती. पाच वर्षांनंतर त्यांचा पराभव झाला होता. मात्र २००३ सालापासून ते या जागेवरून सलग तीन वेळा विजय मिळवला होता. २०१४ साली त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीतही त्यांनी विजयी कामगिरी केली. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला होता. ते सध्या खासदार आहेत.

रमेश बिधुरी वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत

रमेश बिधुरी हे वेगवेगळ्या कारणामुळे कायम चर्चेत राहिलेले आहेत. २०१५ साली काँग्रेस, सीपीआय (एम), राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस या पक्षांच्या एकूण पाच महिला खासदारांनी बिधुरी यांच्याविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. बिधुरी यांनी संसदेत आक्षेपार्ह, लैंगिक विधान केल्याचा आरोप या महिला खासदारांनी केला होता. कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनावर बोलताना त्यांनी २०२० साली आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

विरोधकांनी केला होता निषेध

रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांना दहशतवादी, मुल्ला असे म्हटल्यानंतर संसदेत संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विरोधकांनी या विधानाचा निषेध करत बिधुरी यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. बिधुरी यांनी केलेल्या विधानाचे गांभीर्य ओळखून भाजपाचे नेते तथा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत माफी मागीतली होती. तर अधिवेशनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दानिश अली यांची भेट घेत, त्यांना पाठिंबा दिला होता.

हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच भाजपाने त्यांची राजस्थानमधील टोंक जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक केली. बिधुरी यांच्या माध्यमातून हिंदू मते मिळवण्याचा भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना काँग्रेसकडून मिळालेल्या वागणुकीमुळे गुज्जर समाज नाराज असल्याचे म्हटले जाते. याच नाराजीचा फायदा घेण्याचा भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे. बिधुरी यांच्या माध्यमातून गुज्जर समाजातील मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp ramesh bidhuri not present in front of privileges panel regarding inquiry comment against danish ali prd
Show comments