पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपाकडून देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेश भाजपा महिला मोर्चातर्फे ‘लखपती दीदी’ नावाचे अभियान राबविण्यात येणार आहे. भाजपाच्या महिला पदाधिकारी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थीना घरोघरी जाऊन भेटणार आहेत. ३ जून पासून हे अभियान सुरू होत असून लाभार्थी महिलांना ‘लखपती दीदी’ म्हणून हाक मारली जाणार आहे. या लाभार्थी महिलांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करणारे पत्रही लिहून घेतले जाणार आहे. या अभियानाच्या मागची संकल्पना अशी आहे की, आवास योजनेतून जे घर मिळाले, ते लाखो रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या महिलांना ‘लखपती दीदी’ म्हणून संबोधले जाणार आहे. १९ जूनपर्यंत चालणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा महिला मोर्चाच्या उत्तर प्रदेशच्या अध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार गीता शाक्य यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले, “पीएम आवास योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या खूप मोठी आहे. घरासोबतच लाभार्थ्यांना शौचालय आणि मोफत एलपीजी कनेक्शनदेखील मिळाले आहे. या महिला लाभार्थ्यांना ‘लखपती दीदी’ संबोधले जात आहे. भाजपा कार्यकर्ते या लाभार्थ्यांची भेट घेणार असून घर मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनात काय बदल झाला, याची माहिती जाणून घेणार आहेत. पक्षाचे कार्यकर्ते या संवादाचे चित्रीकरण करणार असून या क्लिप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविल्या जाणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी “धन्यवाद मोदी जी” असे पत्रदेखील लिहिण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.”

हे वाचा >> ‘पती, पत्नी, पैसा आणि प्रियकर’; पीएम आवास योजनेचे पैसे बँक खात्यात येताच चार महिलांचा पतीला सोडून प्रियकरासोबत पोबारा!

“ज्या लाभार्थ्यांना पत्र लिहिता येत नाही, त्यांना पक्षाचे कार्यकर्ते मदत करणार आहेत. कार्यकर्ते लाभार्थ्यांच्या भावना पत्राच्या माध्यमातून शब्दबद्ध करतील आणि त्यांच्या वतीने पत्र पाठवतील. तसेच लाभार्थी आणि त्यांना मिळालेल्या घराचा फोटो काढून, तो फोटो नमो ॲपवर पोस्ट केला जाईल,” अशीही माहिती गीता शाक्य यांनी दिली.

३० मेपासून ३० जूनपर्यंत भाजपाकडून राबविण्यात येणाऱ्या महासंपर्क अभियानांतर्गत महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सदर लक्ष्य देण्यात आले आहे. यासोबतच आणखी एक मोहीम हाती घेण्यात आली आहे, ज्याचे नाव ‘नवमतदाता युवती संमेलन’ असे देण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत पक्षातील महिला कार्यकर्त्या १८ ते २५ वयोगटातील युवतींशी संवाद साधणार आहेत. “या वयोगटातील अनेक तरुणींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला मतदान केल्याची शक्यता आहे. मागच्या पाच वर्षांतील मोदी सरकारच्या कामगिरीबाबत त्यांना काय वाटते आणि भविष्यात त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, हे आम्ही तरुणींना विचारणार आहोत. तसेच या मुलींची राजकीय विचारधारा आहे का? असेल तर त्या विचारधारेशी जोडून घेण्याचे कारण काय? असेही प्रश्न या वेळी विचारले जातील. त्यासोबतच २०२४ साली पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनाही असेच प्रश्न विचारले जातील. मोदी सरकारने मागच्या नऊ वर्षांत महिलांच्या सबलीकरणासाठी काय काय केले. त्यांची सुरक्षा आणि शिक्षणासाठी काय केले, याची माहिती या तरुणींना करून दिली जाईल,” अशी माहिती पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांनी दिली.

हे ही वाचा >> गरिबांना मिळणार हक्काचं घर! अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा; जाणून घ्या

उत्तर प्रदेशच्या ८० लोकसभा मतदारसंघांतील प्रत्येक मंडळात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यासोबतच महिला पदाधिकारी अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारतर्फे पोषण आहार दिला जातो, या आहाराबद्दल त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यासोबतच महिला मोर्चाकडून ‘प्रबुद्ध महिला संमेलन’ भरविले जाणार आहे. ज्या माध्यमातून समाजातील विचारवंत महिलांना एकत्र केले जाणार असून त्यांचेही विचार जाणून घेतले जातील.