अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत वाशीम जिल्ह्यातील एकाही मतदारसंघातील उमेदवाराला स्थान देण्यात आलेले नाही. विद्यमान आमदार असतांनाही पक्षाने पहिल्या यादीत त्यांच्यावर विश्वास दाखवला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यमान आमदारांसह इच्छुकांची धाकधुक वाढली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे अद्याप जागा वाटप जाहीर झालेले नाही. तरीही भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये भाजपने महाराष्ट्रातील आपल्या दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपसाठी सोप्या समजल्या जाणाऱ्या जागांवर हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. वाशीम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या तीनपैकी कारंजाची जागा भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनामुळे रिक्त आहे. वाशीममध्ये भाजपचे, तर रिसोडमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. २०१९ मध्ये रिसोड मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला होता. आता भाजपमध्ये रिसोडमधून लढण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत.
हेही वाचा >>> मराठवाड्यातील सर्व विद्यमान आमदारांना भाजपची उमेदवारी; श्रीजया अशोक चव्हाण, अनुराधा चव्हाण नवे चेहरे
गेल्या वेळेस अपक्ष लढून काट्याची टक्कर देणारे अनंतराव देशमुख आता भाजपमध्ये आहेत. ते त्यांचे पूत्र ॲड. नकुल देशमुख यांच्यासाठी ते आग्रही आहेत. विजय जाधव यांनी देखील रिसोडमधून उमेदवारी मागितली. दुसरीकडे महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाने रिसोड मतदारसंघावर दावा केला. आमदार भावना गवळी त्यासाठी आपले राजकीय वजन वापरत आहेत. जागा वाटपाच्या तिढ्यासोबतच बंडखोरीची शक्यता लक्षात घेता भाजपने पहिल्या यादीत रिसोड मतदारसंघातून उमेदवार दिलेला नाही. वाशीम मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघाचे भाजप आमदार लखन मलिक प्रतिनिधित्व करतात. २००९ पासून सलग तिनदा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यापूर्वी १९९० मध्ये देखील ते विजयी झाले होते. वाशीम जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ आमदार असतांना पक्षाने पहिल्या यादीत त्यांना उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्यावर निष्क्रियतेची टीका सातत्याने होते. वाशीममध्ये पक्षांतर्गत उमेदवारी मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे पहिल्या यादीत मलिकांना स्थान मिळाले नाही.
हेही वाचा >>> भाजपच्या यादीत आर्णी, उमरखेडचे उमेदवार नाही
दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनामुळे कारंजा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी व वंचित आघाडीत लढत झाली होती. त्यामध्ये राजेंद्र पाटणी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता. दीर्घ आजारामुळे २३ फेब्रुवारी २०२४ ला त्यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे. आता कारंजातून लढण्यासाठी पाटणी याचे ज्ञायक पाटणीसह अनेक जण इच्छूक आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात येथूनही भाजपने उमेदवार दिलेला नाही.
शाश्वती नाही?
वाशीम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. उमेदवार जाहीर केल्यास नाराजी पसरून बंडखोरीचा धोका होऊ शकतो. शिवाय महायुतीमध्ये जागा वाटपाचे चित्र देखील अस्पष्ट आहे. वाशीम जिल्ह्यातील कुठल्याही मतदारसंघात भाजपचा एकतर्फी विजयाची शाश्वती नाही. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपने पहिल्या यादीत वाशीम जिल्ह्यातील मतदारसंघांना स्थान मिळाले नसल्याची चर्चा आहे.