नागपूर : भाजपने अलीकडेच विदर्भातील शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या नवीन नियुक्त्या केल्या. यात इतर मागासवर्गीय समाजाला (ओबीसी) अधिक प्राधान्य देऊन पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतांवरील पक्षाची पकड अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील शहर व जिल्हाध्यक्ष बदलवण्यासंदर्भात एक समिती स्थापन केली होती. समितीने विविध जिल्ह्यातील जातीय समीकरणाचा अभ्यास करून अहवाल प्रदेश कार्यालयाला दिला होता. त्या आधारावर विदर्भात नागपूर शहर, ग्रामीण, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर शहर व ग्रामीण, गडचिरोली या पूर्व विदर्भासह पश्चिम विदर्भातही पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. ते करताना ओबीसीतील नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.

हेही वाचा – विरोधकांच्या ‘इंडिया’ नावावर मोदींचे टीकास्र; ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिद्दीन आणि पीएफआयशी केली तुलना

नागपूरमध्ये बजरंगदल ते भाजप असा प्रवास करणारे बंटी कुकडे यांची शहर अध्यक्षपदी तर माजी आमदार सुधाकर कोहळे यांची नागपूर ग्रामीणच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. हे दोन्ही नेते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. अमरावतीमध्ये जिल्हाध्यक्षपदी नियुक्त खासदार अनिल बोंडे असो किंवा शहर अध्यक्षपदी नियुक्त माजी मंत्री प्रवीण पोटे असो, खामगावमध्ये सचिन देशमुख, गोंदियामध्ये येशुलाल उपराळे तर भंडारा जिल्ह्यात प्रकाश बाळबुधे, गडचिरोलीत प्रशांत वाघरे, चंद्रपूर शहर अध्यक्षपदी राहुल पावडे, जिल्हाध्यक्षपदी हरीश देशमुख यांची नियुक्ती कण्यात आली आहे. हे सर्व ओबीसीतील विविध समाज घटकांचे प्रतिनिधित्व करतात.

जिल्हा व शहर अध्यक्षाच्या नियुक्तीच्या पूर्वी भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. त्यातही पक्षाने ओबीसींना संधी दिली होती. आगामी निवडणुकीच्या पाश्वभूमीवर बुथप्रमुख, पेजप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख नियुक्त करण्यात आले. यातही जास्तीत जास्त ओबीसीमधील तरुणांना सधी देऊन त्यांचे नेतृत्व पुढे आणण्याचे भाजपचे नियोजन आहे. एकूणच पक्ष पातळीवरील नियुक्त्यांमध्ये भाजपने ओबीसींना अग्रक्रम दिल्याचे दिसून येते.

हेही वाचा – Manipur Violence : विरोधक मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार, बैठकीत निर्णय!

“भारतीय जनता पक्षाने नेहमीच ओबीसी समाजाला संघटनात्मक पातळीवर आणि सरकारमध्येही प्राधान्याने संधी दिली आहे. त्यासोबतच इतर समाज घटकांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.” – चंदन गोस्वामी, प्रवक्ते, भाजप

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp obc card in appointment of city district presidents in vidarbha print politics news ssb
Show comments