छत्रपती संभाजीनगर : भाजपने ‘माधव’ सूत्राच्या बांधणीसाठी मराठवाड्यात बळ दिलेले ओबीसी नेते निष्प्रभ ठरले असून ती धुरा जरांगे यांच्या आंदोलनामुळे छगन भुजबळ यांच्याकडेच असल्याचे दिसून येत आहे. हाके यांच्या आंदोलनात ‘ओबीसी’ कल्याण मंत्री अतुल सावे मागच्या बाकावर हाेते. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असल्याने ‘ओबीसी’ची एकजूट राजकीय पटलावर कमजोरच दिसून आली. डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपदाचे बळ मिळूनही त्यांना ‘ओबीसी’ नेतृत्व स्वत:कडे ठेवता आले नाही. त्यामुळे आता ओबीसी नेतृत्वाची धुरा भाजपच्या हातातून निसटत चालली असल्याचे चित्र आहे.
जरांगे यांच्या आंदोलनात भुजबळ हेच टीकेच्या केंद्रस्थानी असल्याने ओबीसी नेतृत्वाचे केंद्रस्थान भाजपऐवजी इतर पक्षाकडे वळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विजय वडेट्टीवार यांचे नाव माध्यमांमध्ये चर्चेत असले तरी मराठवाड्यात सर्वत्र त्यांना मानणारे कार्यकर्ते तसे कमीच आहेत. त्यामुळे माधव सूत्र आखणाऱ्या भाजपला ओबीसी नेतृत्व विकासासाठी विशेष आखणी करावी लागेल असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तपदी प्रवीण पवार नियुक्त
२०१४ मध्ये मंत्रीपद मिळावे म्हणून माळी समाजाची मोट बांधणारे सावे यांना ‘ओबीसी मंत्रालय’ मिळाले पण जरांगे – हाके आंदोलनात ओबीसींचा नेता म्हणून छगन भुजबळ यांच्यावर टीका झाली. ना कधी जरांगे यांनी अतुल सावे यांच्यावर टीका केली ना त्यांची दखल घेतली. उपोषण सोडविण्याच्या चमूमध्ये ते असायचे पण त्यातही ते मागच्याच बाकावर. त्यामुळे भाजपची ‘ओबीसी’ची बाजू मांडण्यासाठी नेता असून त्यांची प्रतिमा काही उजळली नाही. डॉ. भागवत कराड यांना नव्या मंत्रीमंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. पण मंत्री असतानाही ‘ओबीसी’चा नेता होण्याऐवजी औरंगाबादचा लोकसभेसाठी उमेदवार होण्यातच त्यांची उर्जा खर्ची पडली, अशी टीका त्यांच्यावर केली जाते.
वंजारी समाजात पर्याय नेतृत्व उभे करण्यासाठी रमेश कराड यांनाही बळ देण्यात आले. पण ओबीसी आंदोलनात भाजपने बळ दिलेल्या नेत्यांपेक्षाही छगन भुजबळ हेच वरचढ असल्याची प्रतिमा निर्माण झाली आहे. जरांगे यांनी भाजपमधील एकाही ओेबीसी नेत्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ‘ओबीसी’ नेतृत्व आपोआप भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा गेले. विविध प्रकरणांमध्ये कलंकित असणारी भुजबळ यांची प्रतिमा ‘ओबीसी’ समाजातून अजून उजळून निघत असताना भाजपचे ओबीसीचे नेते वेगवेगळ्या पातळीवर निष्प्रभ ठरत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर: परधर्मीय तरूणीशी बोलल्यावरून तरुणाला जमावाकडून मारहाण
मराठवाड्यातून भाजपने ‘माधव’ सूत्राची पेरणी केली. वसंतराव भागवत यांच्या संघटन कौशल्यामुळे प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या संगतीने माळी व धनगर समाजातील नेतृत्वास भाजपने बळ दिले. आजही माळी समाजातील अतुल सावे यांना भाजपने पुढे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या नेतृत्वाला झळाळी मिळू शकली नाही. ताकदीच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात सतत झालेल्या पराभवामुळे राजकीय पटलावर जननेत्या असूनही पंकजा मुंडे यांचा शक्तिपातच होताना दिसत आहे. त्यामुळे मराठवाड्यात ओबीसी नेत्यांना बळ देऊनही फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.