आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. केंद्रात सत्ता हवी असेल तर उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. याच कारणामुळे भाजपाने पश्चिम उत्तर प्रदेशकडे विशेष लक्ष दिले आहे. येथील मुस्लीम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाकडून खास मोहीम राबवली जात आहे. ‘स्नेह मिलन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपा येथील मुस्लीम मतदारांशी संवाद साधत आहे.
हेही वाचा >>> महिलेबरोबरचा २२ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल… आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव सापडले अडचणीत
२०१९ मध्ये सहा जागा कमी झाल्या
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पश्चिम उत्तर प्रदेशमधील सर्व १८ जागांवर विजय मिळवला होता. मात्र २०१९ सालच्या निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने युती केल्यामुळे भाजपाला १२ जागांवर समाधान मानावे लागले. येथे चार जागांवर बहुजन समाज पार्टीचा तर दोन जागांवर समाजवादी पार्टीचा विजय झाला होता. मात्र या वेळी येथील सर्व जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपाने ‘स्नेह मिलन’ कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे.
मुझफ्फरनगरमध्ये ‘एक देश एक डीएनए संमेलन’
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे भाजपाकडून पुढील महिन्यात ‘एक देश एक डीएनए संमेलना’चे आयोजन केले जाणार आहे. या संमेलनासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपा प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, केंद्रीय मंत्री आणि मुझफ्फरनगरचे खासदार संजीव बालियान, राज्यमंत्री सोमेंद्र तोमर यांना आमंत्रित केले जाणार आहे.
हेही वाचा >>> भारतातील लोकशाही धोक्यात,’ राहुल गांधींचे लंडनमध्ये विधान; भाजपाची सडकून टीका
मुस्लीम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी खास मोहीम
मुझफ्फरनगरमध्ये मुस्लीम मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने आखलेल्या रणनीतीबद्दल भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कुंवर बासित अली यांनी अधिक माहिती दिली आहे. “पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जवळपास २.५ ते तीन लाख अल्पसंख्याक मतदार आहेत. या मतदारांचा पाठिंबा मिळावा यासाठी भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. कृषीउद्योगात गुंतलेल्या मतदारांपर्यंत भाजपा तेवढ्या प्रभावीपणे पोहोचू शकलेला नाही. सहारनपूरमध्ये जवळपास १.८ लाख तर मुझफ्फरनगरमध्ये जवळपास ८० हजार राजपूत मुस्लीम आहेत. शामली येथे जवळपास एक लाख गुज्जर मुस्लीम तर मुझफ्फरनगरमध्ये एक लाख जाट मुस्लीम आहेत,” असे अली यांनी सांगितले.
हेही वाचा >>> फडणवीस-विखे यांच्या खेळीने नगर जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात; जिल्ह्यातील साखर कारखानदारांवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न
मुस्लीम, हिंदू समाजांतील नेते एकाच मंचावर असणार
स्नेह मिलन संमेलनांच्या माध्यमातून या मतदारसंघात जाट, राजपूत, गुज्जर, त्यागी समाजाच्या हिंदू नेत्यांना मुस्लीम मतदार स्वीकारतील का हे तपासले जाईल, असे सांगत मुस्लीम मतदारांनी फक्त मुस्लीम उमेदवारालाच आपला नेता मानू नये, अशी अपेक्षाही अली यांनी व्यक्त केली. या स्नेह मिलनाच्या कार्यक्रमात भाजपाचे जाट, राजपूत, गुज्जर, त्यागी समाजांतील हिंदू आणि मुस्लीम धर्मीय नेते एकाच मंचावर असतील. मात्र राजपूत मुस्लिमांनी राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांना नेते म्हणून स्वीकारायला हवे. तसेच जाट मुस्लिमांनी संजीव बालियान आणि भूपेंद्र सिंह चौधरी यांना स्वीकारायला हवे. आम्ही या मतदारांना, आपला एकच डीएनए आहे, आपण एकाच देशातील नागरिक आहोत, आपल्याला एकत्र येऊन देशाला पुढे घेऊन जायचे आहे, असे पटवून देण्याचा प्रयत्न करू,” असे अली यांनी सांगितले.
हेही वाचा >>> समाजवादी पक्ष ‘अमेठी’ लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार; काँग्रेसशी आघाडीची शक्यता संपुष्टात?
दरम्यान, भाजपाचा हा प्रयोग यशस्वी होईल का हे आगामी काळात स्पष्ट होईल. त्याआधी भाजपाने ज्या मतदारसंघांत अल्पसंख्याक मतदारांचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा अधिक आहे अशा ६० जागांची निवड केली आहे. या जागांवर भाजपाचे विशेष लक्ष असेल. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने स्नेह मिलनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे.