मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत आगामी काही महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मध्य प्रदेशमध्ये सध्या भाजपा, तर राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष आपापली सत्ता कायम राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून भाजपाने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. या यात्रांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मध्य प्रदेशमध्ये वेगवेगळ्या पाच यात्रांचे आयोजन

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी (३ सप्टेंबर) मध्य प्रदेशमध्ये ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात होणार आहे. भाजपाने मध्य प्रदेशमध्ये अशा एकूण पाच यात्रांचे आयोजन केले आहे. या पहिल्या यात्रेला सातना जिल्ह्यातील चित्रकूट येथून सुरुवात होणार असून ती विंध्य प्रदेशात जाणार आहे. उर्वरित चार यात्रांना या राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून सुरुवात होणार आहे. मध्य प्रदेशच्या शिवराजसिंह सरकार तसेच केंद्र सरकारने आतापर्यंत केलेल्या कामाला जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम या यात्रांच्या माध्यमातून केले जाणार आहे.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

पाच यात्रा, १० हजार ५०० किमी अंतर

या यात्रांचा समारोप २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे. भाजपा नेत्यांच्या म्हणण्यानुसार या पाच यात्रांच्या माध्यमातून साधारण १० हजार ५०० किमी अंतर पार केले जाणार आहे. तसेच एकूण २३० विधानसभा मतदारसंघापैकी साधारण २१० मतदारसंघांतून या यात्रा जाणार आहेत. २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये अशा प्रकारच्या यात्रांचे नेतृत्व हे एकट्या शिवराजसिंह चौहान यांच्याकडे होते. आता मात्र या यात्रांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अशा केंद्रीय नेत्यांचा समावेश असणार आहे.

शिंदे यांच्या बंडखोरीमुळे कमलनाथ यांचे सरकार कोसळले

२०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १०९, तर काँग्रेसला ११४ जागांवर विजय मिळाला होता. बहुमताच्या आधारावर येथे काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपद कमलनाथ यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मात्र, काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे कमलनाथ यांचे सरकार साधारण १५ महिन्यांनंतर कोसळले होते. सध्या ज्योतिरादित्य शिंदे हे केंद्रीय मंत्री आहेत; तर त्यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.

राजस्थानमध्ये भाजपाची परिवर्तन यात्रा

मध्य प्रदेशप्रमाणेच भाजपाने राजस्थान या राज्यातही अशाच रॅलींचे आयोजन केले आहे. भाजपाने या यात्रेला ‘परिवर्तन यात्रा’ असे नाव दिले आहे. या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात प्रचार केला जाणार आहे. या यात्रेला जे. पी. नड्डा यांच्या हस्ते शनिवारी (२ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. यावेळी बोलताना नड्डा यांनी काँग्रेस आणि गेहलोत सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी महिला अत्याचार, भ्रष्टाचार तसेच अन्य मुद्द्यांवरून गेहलोत यांना लक्ष्य केले. तसेच राज्यात बदल हवा असेल तर भाजपाला मत द्यावे, असे आवाहनही केले.

राजस्थानमध्ये यात्रा २०० मतदारसंघांत जाणार

भाजपा राजस्थानमध्ये अशा एकूण चार यात्रांचे आयोजन करणार आहे. ५ सप्टेंबरपर्यंत या सर्व यात्रांचा शुभारंभ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सर्व यात्रा राजस्थानमधील विधानसभेच्या सर्व २०० मतदारसंघात जाणार आहेत. या यात्रेदरम्यान किसान चौपाल, दुचाकी रॅली, महिलांसोबत बैठका, दलित चौपाल इत्यादींचे आयोजन करून जास्तीत जास्त जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी दुसऱ्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही यात्रा डुंगरपूर येथील बेनेश्वर धाम येथून सुरू होईल. आगामी १९ दिवसांत ही यात्रा एकूण ५२ मतदारसंघांतून प्रवास करणार आहे.

राजस्थानमध्येही नेतृत्व केंद्रीय नेत्यांकडेच

तिसऱ्या यात्रेला ४ सप्टेंबर रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे; तर चौथ्या यात्रेची सुरुवात ही केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. तिसऱ्या यात्रेची सुरुवात जैसलमेरमधील रामदेवरा येथून होणार आहे, तर चौथ्या यात्रेची हनुमानगड येथील गोगामेडी येथून सुरुवात होणार आहे. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे या भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. मात्र, येथे देखील या यात्रांचे नेतृत्व केंद्रीय नेत्यांवर सोपवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसची जनसंवाद यात्रा

महाराष्ट्रातही काँग्रेसने अशाच प्रकारच्या यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेला काँग्रेस ‘जनसंवाद यात्रा’ असे नाव दिले आहे. रविवारपासून या यात्रेला प्रारंभ होत असून यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील भाजपा आणि शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) तसेच केंद्रातील मोदी सरकार यांच्या अपयशाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार या यात्रेदरम्यान पक्षाचे कार्यकर्ते गाव, तालुका, शहरा-शहरात जाणार आहेत. यात्रेदरम्यान विद्यमान सरकारचा भ्रष्टाचार, लोककल्याणविरोधी धोरण; याबाबत जनतेला सांगितले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण, तर मराठवाड्यात अशोक चव्हाण या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. या संपूर्ण यात्रेचे नेतृत्व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार करतील. विदर्भात यात्रेचे नेतृत्व नाना पटोले यांच्याकडे असेल.