लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकीत भाजापाने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्या दृष्टीने पक्षाकडून अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून भाजपाने जवळपास १०० विद्यमान खासदारांना डच्चू दिला आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपाने आतापर्यंत ४०५ जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच भाजपा आणखी काही जागांवर उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी उमेदवारांच्या यादीत आणखी काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट होऊ शकतो, असं सांगण्यात येतआहे. असे झाल्यास भाजपा गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त विद्यमान खासदारांना डच्चू देणार आहे.
हेही वाचा – पहिल्या पाच वर्षाच्या तुलनेत दुसऱ्यांदा खासदारकी भूषविताना गडकरींच्या विकास गतीला मर्यादा
विशेष म्हणजे विद्यमान खासदारांचा पत्ता कट करत भाजपाने आपली २०१९ ची रणनीती कायम ठेवली आहे. २०१९ मध्ये भाजपाने ९९ विद्यमान खासदारांचे तिकीट कापले होते. त्यावेळी भाजपाने एकूण ४३७ उमेदवार उभे केले होते, तर इतर जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या होत्या.
विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याच्या या निर्णयाकडे नव्या चेहऱ्यांना संधी देऊन सत्ताविरोधी वातावरण कमी करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या रणनीतीचा एक भाग म्हणून बघितलं जात आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी मोठ्या प्रमाणात जाहीर सभाही घेत आहेत. या ठिकाणी बोलताना केवळ कमळ या चिन्हासाठी काम करा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
एकंदरीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाचे उमेदवार जिंकून यावे, यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यसभेच्या खासदारांनाही लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास सांगण्यात आलं आहे. ही रणनीती २०२१४ मधील भाजपाच्या विजयात महत्त्वाचा घटक ठरली होती. त्यावेळी भाजपाने तत्कालीन राज्यसभा खासदार अरुण जेटली यांना लोकसभेची निवडणूक लढण्यास सांगितले होते.
हेही वाचा – खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात
पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या रणनीतीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणे. गेल्या वर्षीच्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतरही भाजपाने माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना विदिशामधून लोकसभेचं तिकीट दिलं आहे, तर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना या महिन्यात मुख्यमंत्री पद सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना कर्नालमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाच्या रणनीतीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे काँग्रेस आणि इतर पक्षातून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांना उमेदवारी देणे. भाजपाने नुकताच नवीन जिंदल यांना भाजपात प्रवेश दिला आहे. तसेच त्यांना कुरुक्षेत्रमधून उमेदवारीही देण्यात आली आहे. याशिवाय सिरसा येथून अशोक तन्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर पिलीभीतमधून जितीन प्रसादा यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.