दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या रणनीतीमुळे शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आणि भाजपला अतिरिक्त जागेचा फायदा झाला होता. या वेळी काँग्रेसला धक्का देण्याची योजना भाजपने आखली आहे. अशोक चव्हाण यांच्याबरोबर काँग्रेसचे आणखी किती आमदार निवडणुकीपर्यंत राजीनामे देतात यावर सारी गणिते अवलंबून आहेत. राज्यसभा निवडणुकीत राजकीय पक्षांच्या आमदारांना खुल्या पद्धतीने मतदान करावे लागते. म्हणजेच पक्षाने नेमलेल्या प्रतोदाला मतपत्रिका दाखवावी लागते. पक्षाच्या आदेशाच्या विरोधात मतदान केल्यास अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर राहते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने फार नियोजनबद्ध रणनीती आखली होती. मतांची वाटणी करताना केलेले गणित भाजपला उपयोगी पडले. भाजपने पहिल्या दोन उमेदवारांना प्रत्येकी ४८ मते दिली होती. तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना २७ मते मिळाली होती. पहिल्या पसंतीच्या ४१ मतांची तेव्हा विजयासाठी आवश्यकता होती. पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना मिळालेल्या अतिरिक्त ७.२८ मतांमुळे महाडिक यांना दुसऱ्या पसंतीची १४.५६ मते मिळाली. या अतिरिक्त मतांमुळे भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक हे विजयी झाले होते. तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा