यवतमाळ : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड यांनी मंगळवारी शपथ घेतली. ही खेळी खेळून भाजपने एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बंजारा मतदारांना गोंजारण्यासोबतच, या समाजाचे नेते संजय राठोड यांना शह देण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे बोलले जाते.
पोहरादेवी (जि. वाशीम) हे देशातील १० कोटींवर बंजारा समाजाचे श्रद्धास्थान. यवतमाळ व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सातत्याने पुढाकार घेऊन पोहरादेवी येथे बंजारा विरासत नंगारा वास्तूसंग्रहालय निर्माण केले. ५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संग्रहालयाचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमास दोन लाखांच्यावर बंजारा समाजबांधव उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी बंजारा समाजाच्या प्रश्नांबाबत बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मोदी यांनी त्याबद्दल अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे या कार्यक्रमानंतर बंजारा समाजात संतापाची लाट उसळली. यामुळे बंजारा समाज विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात जाण्याचा धोका निर्माण झाल्याने भाजपने थेट या समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांनाच विधान परिषदेवर पाठवून समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, असे बोलले जात आहे.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीसच भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ?
हेही वाचा – उठा, उठा, निवडणूक आली पक्षांतरांची वेळ झाली !
या निर्णयामुळे बंजारा समाज भापजसोबत जुळेल, हा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे. राठोड यांनी पोहरादेवी केंद्रबिंदू ठेवून बंजारा समाजाचे धृवीकरण केल्याने ही बाब स्थानिक राजकरणात अनेकांना खटकत असल्याची चर्चा आहे. बाबुसिंग महाराज यांना आमदारकी देऊन पोहरादेवी येथे राठोड यांच्याशिवाय दुसरे राजकीय शक्तिकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. बंजारा समाजाचे नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बाबुसिंग महाराज यांना विधान परिषद सदस्यत्व देणे म्हणजे पोहरागड येथील गादीचा अपमान आहे, असे म्हटले आहे. हा प्रकार बंजारा समाजाच्या श्रद्धेला ठेच पोहचवणारा असल्याने बाबुसिंग महाराज यांनी ही आमदारकी स्वीकारू नये, अशी विनंती हरिभाऊ राठोड यांनी केली होती. मात्र, बाबुसिंग महाराज यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे आता बंजारा समाजातूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपने यावेळी बंजारा समाजाचे दैवत असलेल्या नाईक घराण्याला विधान परिषदेपासून दूर ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्यावेळी ॲड. नीलय नाईक यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवले होते. मात्र त्यांना पद देऊन भाजपला विशेष फायदा झाला नसावा म्हणून यावेळी भाजपने थेट बंजारा समाजाच्या धर्मगुरूंनाच राजकीय प्रवाहात आणल्याची चर्चा आहे.