Will Maharashtra Pattern repeat in Bihar: महाराष्ट्रात सत्तास्थापन झाल्यानंतर त्याचे धक्का बिहारमध्ये बसू लागले आहेत. विधानसभा निवणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना (शिंदे) पक्षाने मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबविला जावा, अशी मागणी काही नेत्यांनी केली. मात्र या मागणीला बळी न पडता भाजपाने आपला मुख्यमंत्री दिला. आता असाच प्रयोग बिहारमध्ये राबविला जाणार का? अशी भीती मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाला सतावत आहे. २०२२ साली भाजपाने महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवत कमी आमदार असलेल्या शिवसेना (शिंदे) गटाला मुख्यमंत्री पद दिले होते. मात्र यावेळी भाजपाच्या आमदारांचा आकडा प्रचंड मोठा असल्याकारणाने भाजपाने बिहार पॅटर्न राबविला नाही. २०२५ मध्ये बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी भाजपाने नितीश कुमार यांना पाठिंबा दिलेला आहे. पण भाजपाच्या अधिक जागा निवडून आल्यास तिथेही ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबविला जाईल का? अशी चिंता जेडीयूला सतावत आहे.

बिहार विधानसभेच्या २४३ जागा असून बहुमताचा आकडा १२२ आहे. भाजपा बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचल्यानंतर काय? असा प्रश्न जेडीयूच्या नेत्यांना पडला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी यासंबंधी जनता दल (संयुक्त) पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. २०२० च्या निवडणुकीत भाजपाचे ७४ तर जनता दल (संयुक्त) पक्षाचे केवळ ४३ आमदार निवडून आलेले आहेत. भाजपापेक्षा ३१ जागा कमी निवडून आलेल्या असतानाही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले. मात्र आता महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलल्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या राजकीय भवितव्याची चर्चा होत आहे.

जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, नितीश कुमार हे सत्तेसाठी भुकले नाहीत. २०२० मध्ये जेव्हा भाजपापेक्षा कमी आमदार निवडून आले, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास विरोध दर्शविला होता. मात्र भाजपाचे नेते राजनाथ सिंह, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भूपेंद्र यादव यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद घेण्यासाठी भाग पाडले.

एकनाथ शिंदेकडे पर्याय नाहीत

आणखी एका जेडीयूच्या नेत्याने सांगितले की, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे आम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडले आहे. पण तरीही बिहार हे वेगळे राज्य आहे. “एकनाथ शिंदेंकडे कमी पर्याय आहेत. तसेच शिवसेनेचे दोन्ही गट हिंदुत्त्वाचा विषय घेऊन पुढे जात आहेत. जेडीयूपेक्षाही या दोन्ही गटांना मिळणारा पाठिंबा कमी आहे. २०२४ च्या निवडणुकीत बिहारमध्ये जेडीयूला १६.५ टक्के मते मिळाली. ज्यामुळे एनडीएला ४० पैकी ३० जागा जिंकणे शक्य झाले.

जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले, “तुम्ही नितीश कुमार यांना स्वीकारा किवा त्यांचा द्वेष करा. पण त्यांना तुम्ही बाजूला ठेवू शकत नाहीत. एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाड्यांना नितीश कुमार यांची ताकद माहीत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा आणि नितीश कुमार यांचा एकमेकांवर विश्वास नाही

राजकीय विश्लेषक एन. के. चौधरी म्हणाले, “भाजपाकडे इतर विश्वासार्ह पर्याय नसल्यामुळे ते नितीश कुमार यांना डावलू शकत नाहीत. जर नितीश कुमार हे विरोधी आघाडीत गेले तर काय होईल? असाही प्रश्न चौधरी उपस्थित करतात. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे फार शक्तीशाली नेते नाहीत. पण बिहारमध्ये प्रत्येकाला नितीस आपल्या बाजूला असावेत, असे वाटते.” आणखी एक राजकीय विश्लेषक डीएम दिवाकर हे टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, भाजपा विविध मार्गाने नितीश कुमार यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असते. नितीश आणि भाजपा यांचा एकमेकांवर विश्वास नाही. ते फक्त सोय म्हणून एकत्र आले आहेत.