कोल्हापूर: विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षनिष्टेला तिलांजली देण्याच्या हालचाली कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुकांनी चालवल्या आहेत. विरोधी गोटातून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवून विधानसभेत जाण्याचे मनसुबे बहुतांशी मतदारसंघातील नेत्यांमध्ये दिसत असल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
कागल विधानसभा मतदारसंघात याची झलक पाहायला मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली. येथे गेली पाच वर्ष तयारी करणारे भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची चांगलीच कोंडी झाली. बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून घाटगे यांनी तुतारी फंकण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घाटगे यांची भेट घेऊन पुढील डावपेच आखायला सुरुवात केली आहे. परिणामी येत्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत घाटगे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे.
अशीच काहीशी स्थिती शेजारच्या राधानगरी – भुदरगड मतदारसंघात पाहायला मिळत आहे. येथे शिंदे सेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांची उमेदवारी निश्चित असल्याने विधानसभेची तयारी करणारे अजित पवार गटाचे माजी आमदार के. पी . पाटील यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा त्यांचा विचार असला तरी हा मतदारसंघ तूर्तास ठाकरे सेनेकडे असल्याने त्यांनी मातोश्रीचे दरवाजेही ठोठवले आहेत. ज्या पक्षाकडे मतदार संघ जाईल तिथून निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी आहे.
हेही वाचा >>> ‘राज्य वक्फ बोर्डा’ने सुधारणा विधेयकाला विरोध करावा!
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन गेल्यावेळी प्रकाश आवाडे हे अपक्ष निवडून लले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा दिला. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी भाजपकडून लढण्याची तयारी केली आहे. पर्याय म्हणून आमदार पुत्र राहुल आवाडे यांनी शिंदेसेनेचे धनुष्यबाण घेण्याची तयारी चालवली असली तरी येथून शिंदेसेनेचे रवींद्र माने यांनीही जोरदार कंबर कसली असल्याने महायुतीची उमेदवारी कोणाला हा गुंता आहे.
हेही वाचा >>> कारण राजकारण: पंढरपूर मंगळवेढ्याचे निवडणूक रिंगण खुले
कागलमध्ये विरोधकांच्या गळ्याला भाजपचे घाटगे लागले. तशी परिस्थिती चंदगड मध्ये उद्भवू नये यासाठी देवेंद्र फडणवीस हे सावध झालेले दिसतात. शिवाजी पाटील यांना चंदगडच्या जनतेचा आशिर्वाद नक्कीच मिळेल, असे म्हणत गेल्यावेळी येथून बंडखोरी केलेल्या पाटील यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, महाविकास आघाडी कडून येथे लढणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने शिवाजी पाटील वेगळी भूमिका घेणार का हाही प्रश्न आहेच.
असाच गुंता महाविकास आघाडी मध्ये उद्भवला आहे. हातकणंगले राखीव मतदार संघात काँग्रेसचे राजू आवळे आमदार आहेत. येथे ठाकरे सेनेकडून दोनदा आमदार झालेले डॉ. सुजित मिणचेकर यांची पंचाईत झाली आहे. शिंदेसेने कडून त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे . हा मतदारसंघ महायुतीकडून जनसुराज्य पक्षाकडे जाण्याची शक्यता असल्याने तेथूनही ते उमेदवारीबाबत चाचपणी करण्याची शक्यता आहे. एकूणच जिल्ह्यातील बहुतांशी मतदार संघात जिथे उमेदवारी तोच पक्ष महत्त्वाचा वाटू लागल्या असल्याने या सर्व राजकीय गदारोळात पक्षनिष्ठा खुंटीला टांगली गेली आहे.