महेश सरलष्कर
तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती, काँग्रेस आणि भाजप अशी तिहेरी लढत होत आहे. या आठवड्यामध्ये भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. त्यानिमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते व तेलंगणाचे निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर यांच्याशी पक्षाचे धोरण व रणनिती यासंदर्भात केलेली बातचीत.
प्रश्नः तेलंगणामध्ये भाजपचे निवडणूक प्रचारातील मुद्दे कोणते?
जावडेकरः मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची घराणेशाही, भारत राष्ट्र समिती सरकारचा प्रचंड भ्रष्टाचार, खोटी आश्वासने देऊन ओबीसी, दलित, शेतकऱ्यांची फसवणूक या तीन मुद्द्यांभोवती भाजप आक्रमक प्रचार करत आहे. भाजप हा ओबीसींच्या विकासाला प्राधान्य देणारा पक्ष असल्याने हा मुददाही महत्त्वाचा असेल.
प्रश्नः ओबीसींना प्राधान्य देणार म्हणजे काय?
जावडेकरः तेलंगणातील भाजपच्या उमेदवारांची यादी या आठवड्यामध्ये जाहीर होईल. भाजपकडून अधिकाधिक ओबीसी उमेदवारांना रिंगणात उतरवले जाईल. तेलंगणामध्ये ५५ ते ६० टक्के ओबीसी आहेत. ओबीसी समाजासाठी विशेष विकास योजना राबवली जाईल. भाजपचा वचननामा तयार असून लवकरच तो प्रसिद्ध केला जाईल. त्यामध्ये ओबीसींच्या विकासाच्या कार्यक्रमाचा उल्लेख असेल.
प्रश्नः इथे तिरंगी लढत होत असून भाजपला तेलंगणा जिंकता येईल का?
जावडेकरः सत्ताधारी भारत राष्ट्र समितीवर (बीआरएस) लोक प्रचंड नाराज आहेत. सरकारविरोधी जनमताचा फायदा भाजपलाच मिळेल. बीआरएस, काँग्रेस आणि एमआयएम यांची छुपी युती आहे. ‘बीआरएस’ तर काँग्रेसमध्ये विलीन होणार होता. पण, त्यांची बोलणी फिसकटली. हे तीनही पक्ष एकत्र असतील तर मतदारांसमोर फक्त भाजपचा पर्याय उरतो. शिवाय, काँग्रेसचे आमदार पक्ष सोडून ‘बीआरएस’मध्ये जातात असा अनुभव आहे. विधानसभेतील काँग्रेसच्या १८ पैकी १२ आमदार बीआरएसमध्ये गेले होते. काँग्रेसला मत म्हणजे ‘बीआरएस’ला मत देणे असा अर्थ होतो.
प्रश्नः तेलंगणामध्ये भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?
जावडेकरः निवडणुकीच्या प्रचारात आम्ही पक्ष म्हणून उतरलो आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्ता महत्त्वाचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली प्रचार केला जाईल. तेलंगणामध्ये भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपदासाठी दोन-तीन नेत्यांचा गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो. संभाव्य नावाबद्दल केंद्रीय नेतृत्वासमोर आमचे मत मांडू.
प्रश्नः केंद्रीयमंत्री व प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी मुख्यमंत्री होऊ शकतील का?
जावडेकरः जी. किशन रेड्डी चांगले काम करत आहेत. ते चौथ्यांदा प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. मीही तिसऱ्यांदा निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहात आहे. मुख्यमंत्री पदाचा निर्णय संसदीय मंडळाच्या बैठकीत घेतला जाईल.
प्रश्नः सत्ताधारी ‘बीआरएस’वर लोक का रागावलेले आहेत?
जावडेकरः तेलंगणामध्ये केसीआर यांचे अख्खे कुटुंब सत्ता उपभोगत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये लोकांना काय मिळाले? दलित बंधूंना १० लाख रुपये, बीसी बंधू व अल्पसंख्याकांना १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचे १ लाखाचे कर्ज माफ केले जाणार होते. दलित व आदिवासींना अनुक्रमे ३ व २ एकर जमीन, युवकांना ३ हजारांचा दरमहा भत्ता, केजी टू पीसी शिक्षण मोफत दिले जाणार होते. यापैकी एकही आश्वासन केसीआर सरकारने पूर्ण केलेले नाही. या सरकारच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या तर इतक्या आहेत की कल्पनाही करता येणार नाही. भ्रष्टाचारामुळे कालेश्वर धरण प्रकल्पाचा खर्च ३० हजार कोटींवरून १ लाख कोटींवर गेला आहे.
प्रश्नः तेलंगणातील मतदारांनी भाजपला मते का द्यावीत?
जावडेकरः इथल्या मतदारांना भाजप हाच एकमेव पर्याय आहे. ओबीसी-दलित-आदिवासींचा विकासाला भाजपने प्राधान्य दिलेले आहे. ‘परिवर्तन करा, तेलंगणाचे भाग्य बदला’, असे भाजपचे घोषवाक्य आहे.