बुलढाणा : एकेकाळी जनसंघ आणि नव्वदीच्या दशकानंतर ते २०१९ पर्यंत वर्चस्व राहिलेल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघात भाजप यंदा भाकरी फिरवण्याच्या बेतात आहे. तब्बल तीन दशके या मतदारसंघावर अधिराज्य गाजवणारे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यासाठी ही धक्कादायक बाब मानली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवंगत अर्जुनराव वानखेडे यांनी काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’ वर्चस्व असताना येथे जनसंघाचा ‘दिवा’ तेवत ठेवला. ते आमदारदेखील झाले. चैनसुख संचेती यांचे काका किसनलाल संचेती यांचाही यात महत्त्वाचा वाटा राहिलाय. १९८० मध्ये ते आमदार झाले. कालांतराने नव्वदीच्या दशकात चैनसुख संचेती यांचा राजकीय उदय झाले. मात्र १९९५ मध्ये भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंड पुकारात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ते आमदार झाले आणि नंतर भाजपचे येथील सर्वेसर्वा झाले. १९९५ ते २०१४ पर्यंत सलग पाच वेळा ते आमदार राहिले. २०१९ मध्ये भाजपने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेसचे राजेश एकडे यांनी त्यांचा पराभव झाला.

आणखी वाचा-ठाणे, पालघरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ‘जिजाऊ’ संघटना

२०१९ च्या लढतीतच उमेदवार बदलण्याचा भाजपकडून विचार सुरू होता. मात्र ऐनवेळी संचेती यांनाच संधी देण्यात आली आणि ती भाजपची घोडचूक ठरली! यंदा मात्र भाजपने ती चूक दुरुस्त करण्याचा चंग बांधला आहे. यामुळेच मलकापूरमध्ये भाकर बदलणे किंवा फिरवण्याच्या मनस्थितीत भाजप आहे.

मलकापूरसाठी चैनसुख संचेती, त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवचंद्र तायडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे हे इच्छुक आहेत. याशिवाय जुनेजाणते अनंतराव सराफ यांचे चिरंजीव पराग सराफ यांच्या नावावर चर्चा झाली. यात भर पडली ती अमित लखानी या नवीन चेहऱ्याची. संघ परिवाराशी निगडित असलेले लखानी हे संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. सुपरिचित व्यावसायिक आणि मतदारसंघात स्वतंत्र जाळे असणाऱ्या लखानी यांच्या नावावर भाजप आणि परिवार गांभीर्याने विचार करीत आहे.

आणखी वाचा-वडगावशेरीत भाजप-राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत?

निवडणुकीसाठी कायम सुसज्ज असणारे संचेती यासाठी तयार आहेत का? हा कळीचा मुद्दा आहे. यामुळे २९ वर्षानंतर शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजपमध्ये बंड होऊन इतिहासाची पुनरावृत्ती होते का? राजकीय कारकिर्दीच्या अंतिम टप्पात संचेती हे राजकीय धाडस करतील का, असे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. याकडे भाजपसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याचा उलगडा भाजप उमेदवारांच्या दुसऱ्या यादीनंतरच होईल, असा सध्याचा रागरंग आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp preparing to change candidates in malkapur signs of rebellion after three decades print politics news mrj