काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या चांगलेच सक्रिय झाले आहेत. कामगार, मजूर, शेतकरी, ट्रकचालक अशा वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधून ते त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून राहुल गांधींच्या या कृतींकडे पाहिले जात आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या ‘महोब्बत की दुकान’ला भाजपानेही जशास तसे उत्तर दिले जात आहे. गुजरातमध्ये एका सभेदरम्यान बोलताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली. राहुल गांधी महोब्बत की दुकान नव्हे द्वेषाचा मॉल घेऊन चालतात, असे नड्डा म्हणाले.
गोध्रा येथे सभेत बोलताना नड्डा आक्रमक
जे. पी नड्डा पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा येथे एका सभेला संबोधित करत होते. या सभेदरम्यान त्यांनी काँग्रेस, राहुल गांधी तसेच विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधातील सर्व पक्ष कुटुंबकेंद्रीत आहेत, असा दावा त्यांनी केला.
“ज्यांनी आणीबाणी लागू केली ते लोकशाहीबद्दल बोलत आहेत”
“जेव्हा-जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरात प्रशंसा होते, तेव्हा-तेव्हा काँग्रेस पक्षाला वाईट वाटते. ते मोदी यांचा विरोध करताना देशालादेखील विरोध करायला लागले आहेत. राहुल गांधी ब्रिटनमध्ये जाऊन भारतातील लोकशाही धोक्यात आहे, असे सांगतात. राहुल गांधी यांच्याच आजीने १९७५ साली देशात आणीबाणी लागू केली होती. तेव्हा देशात साधारण १.५ लाख लोकांना अटक करण्यात आली होती. असे असताना ते आता लोकशाहीची भाषा करत आहेत,” अशी टीका नड्डा यांनी केली.
महोब्बत की दुकान नव्हे, द्वेषाचा मॉल
“मोदी यांची बदनामी करण्यासाठी ते नीच, विंचू, चाहावाला अशा शब्दांचा वापर करतात. मोदी १४० कोटी लोकांची सेवा करत आहेत, म्हणून ते नाराज आहेत. ते ‘महोब्बत की दुकान’ असे म्हणत आहेत. मला तर याचे आश्चर्य वाटते. ते सतत मोदी यांचा द्वेष करतात. खरं पाहता ते महोब्बत की दुकान नव्हे तर द्वेषाचा मॉल सोबत घेऊन फिरत असतात,” अशी घणाघाती टीका जे. पी. नड्डा यांनी केली.
विरोधातील सर्व पक्ष कुटुंबापुरतेच मर्यादित
“पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे देशाची सेवा करत आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते आपापल्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असेदेखील नड्डा म्हणाले. हा दावा करताना त्यांनी समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, भारत राष्ट्र समिती, काँग्रेस अशा पक्षांचा उल्लेख केला. या पक्षांत स्वत:च्या वारसदाराकडेच पक्षाची सुत्रे दिली जातात, असा आरोप नड्डा यांनी केला.
काँग्रेस पक्ष फक्त गांधी कुटुंबाचा
“सध्या काँग्रेस पक्ष हा एका कुटंबापुरताच मर्यादित आहे. हा पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी या तीन नेत्यांपुरताच उरला आहे. बाकीचे सर्व नेते पक्षामध्ये कंत्राटी आहेत,” अशी टीकाही नड्डा यांनी केली.