दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून नुकताच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचंदेखील नाव आहे. दरम्यान, यावरून भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून शनिवारी भाजपा कार्यकर्त्यांकडून दिल्लीतील आपच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली.
हेही वाचा – “बाबरला हटवून राम मंदिर बांधलं…”, आसामचे मुख्यमंत्री म्हणाले, दिलेलं वचन आम्ही पाळलं
भाजपाकडून केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी
यासंदर्भात बोलताना, भाजपा नेते तजिंदरपाल सिंग बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. ज्या व्यक्तीला कंत्राट देण्यात आलं होतं, त्याच व्यक्तीने म्हटलं आहे की, ‘अरविंद केजरीवाल त्याला गोवा निवडणुकीच्या वेळी फोन करून पक्षाचा प्रचार करणाऱ्यांना पैसे देण्यासाठी सांगत होते. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा, असे ते म्हणाले. तसेच आज आप कार्यालयाबाहेर झालेला विरोध केवळ सांकेतिक असून जर केजरीवाल यांनी राजीनामा नाही दिला, तर संपूर्ण दिल्लीत विरोधप्रदर्शन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नेमकं काय आहे प्रकरण?
दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी ईडीकडून दुसऱ्यांना आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपत्रात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि विजय नायर या व्यक्तीचे नाव आहे. विजय नायर आणि अरविंद केजरीवाल यांच्यात जवळचे संबंध असल्याचे या आरोपपत्रात म्हटलं आहे. तसेच विजय नायर या व्यक्तीने कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यातून कमावलेला पैसा आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान वापरला, असा आरोपही ईडीच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.