राजस्थानमध्ये सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी येथे भाजपा, काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. भाजपाने पक्षबळकटीसाठी कार्यकारिणीमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. या कार्यकारिणीच्या माध्यमातून सर्व समाजाच्या नेत्यांना प्रतिनिधित्व मिळावे याची भाजपाने काळजी घेतली आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या नेत्या वसुंधरा राजे यांना विरोध करणाऱ्या मदन दिलावर यांना यावेळी कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही.
पक्ष बळकट करण्याची क्षमता बघूनच नियुक्ती
तीन महिन्यांपूर्वी सी. पी. जोशी यांची राजस्थान भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता येथे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत बदल करण्यात आला आहे. अनेक नव्या नेत्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या नियुक्त्यांनुसार भाजपाच्या राजस्थान कार्यकारिणीत एकूण ११ उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस, ११ सचिव, १ कोषाध्यक्ष, १ सहकोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. पक्ष बळकट करण्याची क्षमता बघूनच या नेत्यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
महंत बालकनाथ राज्य उपाध्यक्षपदी
नव्या कार्यकारिणीत खासदार महंत बालकनाथ यांना राज्य उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. ते काँग्रेस पक्षाचे प्रखर विरोधक मानले जातात. बालकनाथ हे ओबीसी प्रवर्गातील यादव समाजातून येतात. मागील काही वर्षांपासून त्यांचे राजस्थानच्या राकारणात प्रस्थ वाढत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अलवर मतदारसंघातून काँग्रेसचे नेते भंवर जितेंद्र सिंह यांना पराभूत केले होते. तेव्हापासून ते काँग्रेसवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका करत असतात. ते काँग्रेसवर मुघलांचा पक्ष असल्याचा आरोप करतात.
बालकनाथ यांच्यासह गुज्जर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे टोंक-सवाई माधोपूरचे खासदार सुखबीर जौनापुरिया, जाट समाजातून येणारे माजी खासदार सी. आर. चौधरी, संतोष अहलावत तसेच माजी मंत्री प्रभूलाल सैनी यांचीदेखील उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वसुंधरा राजे यांच्या विरोधकांना वगळले
भाजपाच्या याआधीचे प्रदेशाध्यक्ष पुनिया यांनी वसुंधरा राजे यांचे विरोधक मदन दिलावर यांचा कार्यकारिणीत समावेश केला होता. मात्र नव्या कार्यकारिणीत दिलावर यांना वगळण्यात आले आहे. वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळात दिलावर यांना अडगळीत टाकण्यात आले होते. मात्र पुनिया प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दिलावर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. जयपूरमधील राजघराण्यातील नेत्या दिया कुमारी यांचे कार्यकारिणीतील स्थान कायम ठेवण्यात आले आहे.
ओबीसी, एससी, एसटी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना स्थान
राजस्थान भाजपाने कार्यकारिणीत ओबीसी आणि एमबीसी (मोस्ट बॅकवर्ड क्लास) समाजाचे योग्य प्रतिनिधित्व असावे, याची योग्य काळजी घेतली आहे. नव्या कार्यकारिणीत जाट, गुज्जर, यादव, बिश्नोई, कुमावत, सैनी समाजाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या कार्यकारिणीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नेत्यांनाही स्थान देण्यात आलेले आहे.
नव्या कार्यकारिणीत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग
नव्या कार्यकारिणीसंदर्भात भाजपाच्या एका नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली आहे. “सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्यासाठी मागास जाती, एससी, एसटी प्रवर्गातील नेत्यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. या कार्यकारिणीत आमदार, खासदार यांची संख्या कमी आहे. त्याऐवजी पक्षाला बळकट करण्याची क्षमता लक्षात घेऊन कार्यकारिणीत नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे,” असे या नेत्याने सांगितले.