आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देशातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. देशातील महत्त्वाच्या पक्षांकडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि पूर्ण ताकदीने आयोजित केले जात आहेत. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळादेखील भाजपाने तेवढ्याच ताकदीने आयोजित करण्याचा निर्धार केलेला आहे. हा सोहळा देशभरात एका सणाप्रमाणे साजरा करावा, असे भाजपाकडून सांगितले जात आहे. असे असतानाच बिहारमध्ये आगामी १५ दिवसांत मोठ्या घडामोडी घडणार आहेत. एकीकडे राम मंदिर सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना दुसरीकडे विरोधकांकडून बिहारमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न

सामाजिक न्यायाला केंद्रस्थानी ठेवून विरोधक बिहारमध्ये लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची धामधूम असेल. त्याची तयारी आतापासूनच केली जात आहे. दुसरीकडे आजपासून (१४ जानेवारी) काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरुवात झाली असून, या यात्रेच्या माध्यमातून जनतेला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. या यात्रेला मणिपूरमधून सुरुवात होणार आहे. तसेच बिहारमध्ये सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षाकडून समाजवादी नेते तथा बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. बिहारमधील अतिमागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.

भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून संवादाचा प्रयत्न

एकीकडे राम मंदिर आणि मोदी सरकारने राबवलेल्या योजना यांचा आधार घेत, भाजपा प्रचार करत आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसकडून भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून लोकांना काँग्रेसची विचारधारा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. या यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. साधारण दोन महिने चालणाऱ्या या यात्रेची सांगता मुंबईत होणार आहे. या दोन महिन्यांच्या काळात राहुल गांधी, तसेच काँग्रेसचे इतर नेते वेगवेगळ्या राज्यांतून प्रवास करतील. या यात्रेदरम्यान लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच काँग्रेसकडून पुरस्कार केल्या जाणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय या न्यायाच्या वेगवेगळ्या संकल्पना जनतेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल.

घटक पक्षांना यात्रेत सामील होण्याचे आवाहन

इंडिया आघाडीतील घटक पक्षांनादेखील काँग्रेसने या यात्रेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. विरोधकांकडून काही दिवसांपासून जातीआधारित जणगणनेची मागणी केली जात आहे. काँग्रेसच्या यात्रेत सहभाग नोंदवीत विरोधक या मागणीला आणखी हवा देण्याचा प्रयत्न करतील.

कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त बिहारमध्ये मोठे कार्यक्रम

बिहारमधील महायुती सरकारने गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी जातीआधारित सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला. या अहवालातून इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि अतिमागास प्रवर्गातील (ईबीसी) लोकांची संख्या ही ६३ टक्के असल्याचे समोर आले. या अहवालाच्या माध्यमातून ओबीसी आणि ईबीसी प्रवर्गाचे महत्त्वच एक प्रकारे अधोरेखित झाले. त्यामुळे इंडिया आघाडीकडून देशभरात जातीआधारित जनगणना करण्याची मागणी केली जात आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून जेडीयू पक्षाकडून समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बिहारमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ते २४ जानेवारी असे एकूण तीन दिवस हे कार्यक्रम चालणार आहेत. समस्तीपूर जिल्ह्यातील पितौंझिया या गावाचे नाव बदलून, ते कर्पुरी ग्राम, असे करण्यात आले आहे. याच गावात बिहार सरकारकडून कर्पुरी चर्चा नावाने कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात काही पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे. नितीश कुमारही या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

त्यामुळे बिहारमध्ये आगामी काही दिवस मोठ्या घडामोडी घडणार आहेत. मंडल आणि कमंडल राजकारणाने पुन्हा एकदा जोर धरला आहे.