महेश सरलष्कर
लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे वादात सापडलेले भाजपचे नेते ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात देशभरातून दबाव वाढू लागल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या पंखांना कात्री लावण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. कोणतीही वादग्रस्त विधाने न करण्याचा संदेश ब्रिजभूषण यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या हस्तक्षेपामुळे ब्रिजभूषण यांनी ५ जून रोजी अयोध्येतील संतांच्या मदतीने आयोजित केलेले शक्तिप्रदर्शनही रद्द केले आहे.
कैसरगंजचे भाजपचे खासदार व राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे नुकतेच पायउतार झालेले अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात ७ महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा गुन्हा दिल्ली पोलिसांमध्ये दाखल केला असून तक्रारदारांपैकी एक कुस्तीगीर अल्वयीन असल्याने ‘पॉक्सो’ या अत्यंत कडक कायद्याखाली ब्रिजभूषण यांच्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते. ब्रिजभूषण यांच्या अटकेची शक्यतीही व्यक्त केली जात आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून संदेश देण्यात आला असावा अन्यथा ब्रिजभूषणसारख्या बाहुबली नेत्याने अयोध्येतील रॅली रद्द केली नसती, असे मानले जात आहे.
हेही वाचा >>>पंतप्रधान मोदी यांची अजमेर येथील सभा वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वासाठी महत्त्वाची का आहे?
महिला कुस्तीगिरांच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी आरोपांची अधिक माहिती देण्यास नकार दिला होता. मात्र, अचानक गुरुवारी व शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी सातही महिला कुस्तीगिरांच्या आरोपांचा सविस्तर तपशील प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवला गेला. या महिला कुस्तीगिरांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर असून आरोपांचा तपशील प्रसारमाध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे देशभरातून ब्रिजभूषण विरोधात संतापाची लाट उसळली आहे. ब्रिजभूषण यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून वातावरण निर्मितीचे संकेत दिले गेल्याचे मानले जात आहे.
उत्तर प्रदेशातील अवध परिसरात ब्रिजभूषण अत्यंत ताकदवान नेता असून ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या तसेच, संघाच्या अत्यंत नजिक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आत्तापर्यंत ब्रिजभूषण यांना ‘संरक्षण’ देण्यात आले होते. ब्रिजभूषण यांचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फारसे चांगले संबंध नाहीत. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासाठी ब्रिजभूषण हे पक्षांतर्गत राजकारणासाठी अत्यंत उपयुक्त ठरले होते. योगी व ब्रिजभूषण हे एकाच समाजातून आलेले आहेत.
हेही वाचा >>>सोमनाथ चॅटर्जी आणि हरिवंश…. पक्षादेश मोडणारे पिठासीन अधिकारी
महिला कुस्तीगिरांचे आंदोलन अनपेक्षितपणे व्यापक झाले असून भाजपच्या हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेशातील जातीच्या समीकरणाला जबर फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ब्रिजभूषण यांना आक्रमक न होण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समजते.
महिला कुस्तीगिरांच्या मागे हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट समाजाने मोठी ताकद उभी केली आहे. दिल्लीच्या वेशीवर झालेल्या शेतकरी आंदोलनामध्ये पंजाबमधील शीखांप्रमाणे हरियाणातील जाट शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला जेरीला आणले होते. हरियाणामध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक असून तिथे भाजपची स्थिती पूर्वी इतकी मजबूत राहिलेली नाही. महिला कुस्तीगिरांना विविध खाप पंचायती, शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीमध्ये महिला पंचायत पोलिसांनी होऊ दिली नाही. शिवाय, जंतरमंतरवरील महिला कुस्तीगिरांचे आंदोलन क्रूरपणे मोडून काढले. त्यामुळे जाट समाज प्रचंड संतप्त झाला असून संभाव्य राजकीय फटका टाळण्यासाठीही ब्रिजभूषण यांना सबुराची सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा >>>वाशीममध्ये भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पटणी यांना मोठा धक्का
ब्रिजभूषण हे राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली असून किमान १०-१२ विधानसभा मतदारसंघांतील निकाल एकहाती फिरवण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. पण, आता ब्रिजभूषण यांना उघडपणे पाठिंबा देता येणार नाही याची जाणीव भाजपला झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद योगींकडे असून ते ब्रिजभूषण यांच्या पाठिशी असणाऱ्या आपल्या समाजाच्या दिग्गजांना समजावून सांगू शकतात. त्यामुळे ब्रिजभूषण यांच्यावर फौजदारी कारवाई झाली तरी, होणारे संभाव्य राजकीय नुकसान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नियंत्रणात आणू शकतील असा कयास बांधला जात आहे.