प्रथमेश गोडबोले
पुणे : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) बरखास्त करण्यात आली होती. या समितीवर नव्याने २० सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीवर भाजप आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या सत्ताधारी पक्षांमधील माजी आमदार, खासदारांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे माजी आमदारांच्या हाती जिल्ह्याची तिजोरी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, माजी आमदार आणि खासदार यांचे या निमित्ताने पुनर्वसन करण्यात आले आहे.
विधिमंडळ सदस्यांतून दोन, जिल्हा नियोजनच्या कामकाजाचे ज्ञान असलेले चार, तर १४ विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात सत्तातंर झाल्यानंतर डीपीसी बरखास्त करण्यात आली होती. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले, तरी
नियोजन समितीवरील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती.
हेही वाचा… अहमदपूरमध्ये भाजपासमोर बंडखोरी रोखण्याचे आव्हान
विधिमंडळ सदस्यांमध्ये भाजपचे खडकवासला आणि दौंडचे आमदार अनुक्रमे भीमराव तापकीर, दौंडचे राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खडकवासला हा शहरी आणि ग्रामीण असा मिश्र मतदारसंघ आहे. तसेच खडकवासला आणि दौंड या ठिकाणी सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या दोन्ही आमदारांनी निसटता विजय मिळविला आहे. डीपीसीवर निवड करून त्यांना ताकद देण्यात आली आहे. जिल्हा नियोजनच्या कामकाजाचे ज्ञान असलेले सदस्य म्हणून माजी मंत्री इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, पुरंदरचे माजी मंत्री विजय शिवतारे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि सन २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले माजी सभागृह नेता गणेश बिडकर यांची वर्णी लावण्यात आली आहे.
हेही वाचा… नागपूर शिक्षकमध्ये सर्वच उमेदवारांची मदार दुस-या पसंतीच्या मतांवर
विशेष निमंत्रित सदस्य म्हणून मावळातून सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी मंत्री बाळा भेगडे, हडपसरमधून पराभूत झालेले योगेश टिळेकर, मूळच्या शिवसेनेच्या आणि आता भाजपात आलेल्या जुन्नरच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशा बुचके, भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेवनाना काळे, शिरूरचे भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे, भाजपचे भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, भाजपचे बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी विजय फुगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हवेलीचे प्रवीण काळभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा… ‘लहान भाऊ ’ उद्धव ठाकरे ठरले आता विकास प्रकल्प रोखणारे ‘खलनायक’
दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच शिरूर, मावळ, हडपसर, जुन्नर, दौंड, इंदापूर, बारामती, भोर, हवेली अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील पदाधिकारी, माजी आमदारांची समितीवर निवड करून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जास्तीतजास्त कामे मंजूर करून घेण्याचा भाजपचा दिसतो.