महेश सरलष्कर
‘रिवाज’ बदलण्याची हाक देऊनही भाजपला हिमाचल प्रदेशची धास्ती वाटू लागली असून गुजरातमध्येही तिरंगी लढतीमध्ये सत्ता राखण्यासाठी आदिवासीबहुल मतदारसंघांवर अधिक भिस्त ठेवली आहे. रविवारी झालेल्या भाजपच्या महासचिवांच्या बैठकीत दोन्ही राज्यांतील निवडणूक निकालांच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे समजते. हिमाचल प्रदेशमधील बदलणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा तसेच, गुजरातमधील व्यूहरचनेचा आढावा घेण्यात आल्याचे समजते.
हिमाचल प्रदेशमध्ये शनिवारी (१२ नोव्हेंबर) रोजी मतदान झाले. तिथे ७५.६ टक्के मतदान झाले असून २०१७ मध्ये झालेल्या ७५.५७ टक्के मतदानापेक्षा ते जास्त आहे. मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी घराबाहेर पडल्यामुळे सत्ताधारी भाजप अधिक सावध झालेला आहे. १२-१५ मतदारसंघांमध्ये हजारपेक्षा कमी मताधिक्यावर निकालाचे भवितव्य ठरते. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये भाजप सत्ता राखू शकेल असे निर्धास्तपणे सांगता येणार नसल्याचे मत असून भाजप नेत्यांच्या बैठकीत परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला. २०१७ मध्ये ६८ मतदारसंघांपैकी भाजपला ४४ तर, काँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. हिमाचल प्रदेशमध्ये काही मतदारसंघांमध्ये ९० हजार तर, काहींमध्ये ३० हजार मतदार आहेत. त्यांचा कौल काँग्रेसच्या बाजूने गेला आणि बंडखोरांनी घात केला तर, भाजपला सत्ता टिकवणे कठीण जाईल. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिमाचल प्रदेशमधील मतदारांना उमेदवाराकडे न बघता कमळाकडे बघून मतदार करण्याचे आवाहन केले होते.
आदिवासी भागांमध्ये काँग्रेसला अडवणार?
गुजरातमध्ये २०१७ मध्ये ग्रामीण भागांमध्ये काँग्रेसची (४४ टक्के) मते भाजपपेक्षा (४३ टक्के) फक्त एका टक्क्यांने जास्त होती. काँग्रेसला ग्रामीण भागांमध्ये ५७ तर, भाजपला ३६ जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिरंगी लढत होणार असून आदिवासीबहुल २७ मतदारसंघांवर भाजपची भिस्त असेल. ‘आत्तापर्यंत आदिवासींचे मतदारसंघ काँग्रेसने काबीज केले. पण, डांग मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजपने जिंकली. हा निकाल आदिवासी भागांमधील भाजपसाठी बदलणारे चित्र स्पष्ट करते. या भागांतील मेधा पाटकर वगैरे एनजीओ नेत्यांचा प्रभाव संपुष्टात आलेला आहे. शिवाय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी असल्याने हा मुद्दा देखील प्रचारात प्रभावशाली ठरू लागला आहे’, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. २०१७ मध्ये आदिवासीबहुल २७ मतदारसंघांपैकी १७ जागा काँग्रेस व ८ भाजपला मिळाल्या होत्या. २०२२ पर्यंत हे गणित अनुक्रमे ११ आणि १० असे बदलले. ‘आप’मुळे या मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत झाली तर, लाभ भाजपला होऊ शकेल असे मानले जाते.
१४० जागा मिळण्याची भाजपला आशा
२०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत शहरी भागांमध्ये मिळालेल्या मतांमध्ये भाजप (६० टक्के) व काँग्रेस (३५ टक्के) यांच्या टक्केवारीत मोठा फरक आहे. निमशहरी भागांमध्ये भाजपला ५० टक्के तर, काँग्रेसला ४२ टक्के मते मिळाली होती. भाजपने पन्ना समितीच्या माध्यमातून मतांची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा भाजप करत आहे. सध्या ८६ लाख पन्ना समिती सदस्य आहेत, त्यांच्या कुटुंबातील ३ पैकी २ सदस्यांनी भाजपला मत दिले तरी, भाजपला मिळणारी एकूण मते १ कोटी ४९ लाखांवरून १ कोटी ७५ लाखांवर जाऊ शकेल. २०१७ मध्ये भाजपला सरासरी ५० टक्के मिळाली होती, त्यामध्ये किमान ५ टक्के मतांची भर पडू शकेल, असा भाजप नेत्यांचा कयास आहे. काँग्रेसचे भाजपमध्ये आलेले आमदार आदिवासी आणि ओबीसी आहेत. पाटिदार समाज भाजपच्या मागे उभा आहे. त्यामुळे २०२२ मध्ये भाजपला १४० जागा मिळू शकेल, असा अंदाज भाजपकडून व्यक्त केला जात आहे.