संसदेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी अदाणी प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका केली. मोदी-अदानी यांच्यामध्ये साटेलोटे असून दोघेही एकमेकांना फायदा करून देतात. त्यामुळे उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नाते काय? असा थेट प्रश्न त्यांनी भाजपाला विचारला. दरम्यान, या टीकेनंतर भाजपाने राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा – प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधात विदर्भातील काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांची उघड भूमिका
भाजपाचे राहुल गांधींना प्रत्युत्तर?
राहुल गांधींच्या आरोपावर बोलताना भाजपा नेते रविशंकर प्रसाद म्हणाले, राहुल गांधींनी केलेले आरोप निराधार आहेत. एका प्रामाणिक पंतप्रधानवर आरोप करण्यापूर्वी राहुल गांधींनी लक्षात ठेवावं की आदर्श घोटाळा, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा, कोळसा घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा आणि टूजी स्पेक्ट्रम युपीए सरकारच्या काळात झाला होता. तसेच राहुल गांधींनी हेही विसरू नये की नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि ते स्वत: जामीनावर बाहेर आहेत. भ्रष्टचार करणे आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण देणे ही काँग्रेसची संस्कृती आहे. काँग्रेसमुळेच राफेल कराराला विलंब झाला. डील आणि कमिशन या दोन गोष्टींवरच काँग्रेस पक्ष टीकून आहे.
हेही वाचा – “हिंडेनबर्ग भारतात असतं तर UAPA लागला असता” असदुद्दीन ओवैसी यांचं लोकसभेत टीकास्त्र
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टाकी केली होती. मोदी-अदानी यांच्यामध्ये साटेलोटे असून दोघेही एकमेकांना फायदा करून देतात. अदानींनी २० वर्षांमध्ये मोदींना व भाजपला किती पैसे दिले? मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर जाऊन येतात आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक कंत्राटे अदानींच्या कंपन्यांना मिळतात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देशातील उद्योगजगत त्यांच्या विरोधात होते. त्या काळात अदानी मोदींच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा त्यांचे नाते स्थानिक होते, मग गुजरातव्यापी झाले. मोदी पंतप्रधान झाल्यावर हे नाते राष्ट्रीय झाले, आता तर ते आंतरराष्ट्रीय झाले आहे, असे ते म्हणाले होते.
हेही वाचा – Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येडियुरप्पांना तिकीट मिळण्याची शक्यता कमीच, कारण…
पुढे बोलताना, विमानतळ विकसित करण्यासाठी पूर्वानुभव असलेल्या कंपन्यांनाच कंत्राट देण्याची अट अदानींसाठी बदलण्यात आली आणि देशातील सहा विमानतळे अदानींकडे सुपूर्द केली गेली. मुंबईचे विमानतळाचे कंत्राट असलेल्या ‘जीव्हीके’ कंपनीविरोधात ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’चा ससेमिरा लावून विमानतळ अदानीच्या ताब्यात देण्यासाठी दबाव आणला गेला, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.