उमाकांत देशपांडे

क्रिकेटप्रमाणेच निवडणुकीच्या राजकारणातही खेळपट्टीची अनुकूलता पाहूनच निर्णय घ्यावे लागतात. शिवसेना फुटीनंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी दोन हात करण्यासाठी अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणुकीची खेळपट्टी भाजपच्या दृष्टीने फारशी अनुकूल नव्हती. या निवडणुकीतील यशापयशाचे परिणाम लक्षात घेता आगामी महापालिका निवडणुकीची खेळपट्टी अधिक व्यापक आणि ताकद दाखविण्यासाठी अनुकूल असल्याचा विचार करून पराभवाच्या भीतीने पळ काढल्याची टीका सहन करीत भाजपने माघार घेतली.

present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
Saravankar campaign in front of Shiv Sena Bhavan Participation of MP Shrikant Shinde
शिवसेना भवनासमोरून सरवणकर यांची प्रचारफेरी; खासदार श्रीकांत शिंदे यांचा सहभाग
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के
Mankhurd Shivaji Nagar Seat Muslim candidate
नवाब मलिक वि. अबू आझमी: मानखूर्दमध्ये दोन मुस्लीम नेत्यांच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाला लाभ मिळणार?

शिवसेना पक्षफुटीनंतर भाजप व बाळासाहेबांची शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत नियमित खणाखणी होणारच आहे. त्यानिमित्ताने आपले ‘बाहुबळ ’ किती आहे, हे उभयपक्षी दाखविले जाईल. दोन्ही गटांमध्ये वादाच्या ठिणग्या पडत असताना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे या निवडणुकीत ताकद दाखविण्यासाठी भाजप व शिंदे गटाने व्यूहरचना केली. उद्धव ठाकरे गटाचे धनुष्यबाण चिन्ह मुख्य मंत्री एकनाथ शिंदे गटासाठी मिळविण्याचे किंवा गोठविण्याचे उद्दिष्ट भाजपनेही ठरविले होते. त्यासाठी ही निवडणूक लढविणार असल्याचा दावा करीत शिंदे गटानेकेंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज केला.

हेही वाचा : कोण आहेत अमोल काळे?

शिवसेना पक्ष नाव व चिन्ह गोठविण्याचे उद्दिष्ट साध्य झाले. मात्र ठाकरे गटाला अपेक्षेप्रमाणे मशाल तर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले. या राजकीय खेळीची अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया उमटली आणि सुरुवातीला ठाकरे गटातील नेते व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. मात्र ते उसळून उठले आणि निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले. त्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवार ॠतुजा लटके यांनाच आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न शिंदे गटाने येनकेन प्रकारेण केला. पण तो अयशस्वी झाला. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीत अडथळा उभा करण्यासाठी महापालिका आयुक्तांवर दबाव आणून लटके यांच्या राजीनामा मंजूर न करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उच्च न्यायालयाने महापालिकेला दणका देत हा बेत उधळून लावला.

या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असून दिवंगत रमेश लटके यांचे कामही होते. याबरोबरच शिवसेनेचे नाव व पक्ष चिन्ह गोठविण्याची शिंदे गटाने केलेली कृती आणि लटके यांचा राजीनामा अडविणे, या बाबींची भाजप व शिंदे गटाविरोधात शिवसेनेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. त्यातच शिंदे गट व भाजपकडे काँग्रेस, शिवसेना व नंतर भाजप असा प्रवास करून आलेला आणि खोटे जात प्रमाणपत्र दिल्याने नगरसेवकपद गमावलेल्या मुरजी पटेलांखेरीज अन्य उमेदवार नव्हता. स्थानिक निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची वादग्रस्त पटेल यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी होती. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या आग्रहामुळेच अन्य नेत्यांचे अनुकूल मत नसताना पटेल यांना भाजपने उमेदवारी दिली. शिवसेनेला ताकद दाखविण्यासाठी या पोटनिवडणुकीचा वापर करण्याचे भाजप व शिंदे गटाचे मनसुबे अपेक्षेप्रमाणे फासे न पडल्याने उधळले गेले.

हेही वाचा : दिल्लीत बंदी असताना आप मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले; भाजपा म्हणाली, “केजरीवाल हिंदू विरोधी…”

या परिस्थितीत निवडणूक लढल्यास मोठा पराभव होण्याची भीती भाजपपुढे होती. शिंदे गटाकडून ही विजयी जागा आपल्याकडे घेण्यात यशस्वी झालेल्या भाजप पक्ष श्रेष्ठींना विजयाची खात्री असेल, तरच ती लढविण्यात रस होता. भाजपचा दणदणीत पराभव झाल्यास आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे मनोबल उंचावेल व भाजप कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल. शिंदे गटातील आमदारही अजून स्थिरावले नसून त्यांच्यात चलबिचल व नाराजी आहे, ती वाढीस लागण्याचा धोका होता. अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या पटेल यांच्या विजयाची खात्री नसताना पक्षाला पणाला लावण्याची गरज नसल्याचा विचार पक्षश्रेष्ठींनी केला. त्याचबरोबर सर्वसामान्यांमध्येही ठाकरे यांना अनुकूल वातावरण निर्माण होईल, अशी भीती होती.

त्यामुळे निवडणूक आयोगाकडे धावाधाव आणि लटके यांच्या उमेदवारीत अडथळे आणण्यासाठी जंग जंग पछाडूनही निवडणुकीची खेळपट्टी अनुकूल नसल्याचे लक्षात आल्याने भाजपने निवडणूक रिंगणातून माघार घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आशिष शेलार हे मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले होते व भेटीगाठी झाल्या. त्यातूनच पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे गणित जुळले. ‘ मनसे ‘ राज ठाकरे यांनी उमेदवार मागे घेण्याचे आवाहन करण्याचे निमित्त झाले. ही संधी साधून लटके ज्यांच्या उमेदवार आहेत, त्या उध्दव ठाकरे यांनी जाहीर विनंती न करताही भाजपने पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. पराभवाची जाणीव झाल्यावर निवडणूक रिंगणातून भाजपने पळ काढल्याची टीका उद्धव ठाकरे व अन्य नेत्यांनी केली. भाजप कार्यकर्त्यांमध्येही या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व खळबळ आहे. शेलार यांनी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यास जोरदार विरोध ही केला. मात्र वरिष्ठांच्या व पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे त्यांची पंचाईत झाली.

हेही वाचा : ‘भारत जोडो’ यात्रेतील आकर्षण एकच!

भाजप पक्षश्रेष्ठींनी काही मुद्द्यांचा विचार करून दीर्घकालीन राजकीय लाभांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. काही वेळा तात्कालिक माघार घेतल्याने टीका झाली, तरी दूरदृष्टीने विचार करता ती लाभदायक ठरू शकते, हा विचारही त्यामागे आहे. शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर दावा करणे, हे कधी ना कधी करावे लागणारच होते. महापालिका निवडणुकीच्या वेळी ते केले असते, तर सर्वसामान्यांची सहानुभूती आणि ठाकरेंबरोबर असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांचा संताप याचा फटका त्या निवडणुकीत बसला असता. मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करणे व ठाकरे यांना हटविणे, हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट आहे. आता वातावरण निवळेपर्यंत महापालिका निवडणुका लांबविण्याचे प्रयत्न आहेत. त्यामुळे जी जागा भाजपची नव्हतीच, ती प्रथा-परंपरेचा आव आणून ठाकरे गटाला देण्याची खेळी भाजप पक्षश्रेष्ठींनी केली आहे. आता शिंदे गटाला २०२४ मध्ये या जागेवर युतीच्या जागावाटपात दावा करता येणार नाही व भाजपच ती लढविणार आहे.आता शिवसेना पक्ष नाव व चिन्ह गोठविण्याचा धक्का आणि त्यावरच्या सर्व स्तरांवरील प्रतिक्रिया शांत होत आहेत.

महापालिका निवडणुकीपर्यंत त्यातील हवा काढून टाकायची आणि सर्वसामान्यांशी अधिक संवाद व नाते वाढविण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. दहीहंडी, गणेशोत्सव आणि आता दिवाळी या निमित्ताने मुंबईकरांच्या जवळ जाण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी २३३ हून अधिक ठिकाणी दिवाळी पहाट किंवा त्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळ्या, किल्ले व अन्य स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांमधून भाजप मुंबईकरांपर्यंत पोचण्याचाप्रयत्न करीत आहे. महापालिका निवडणुकीपर्यंत ठाकरेंना असलेली सर्वसामान्यांची सहानुभूती कमी होईल, वातावरण निवळेल किंवा ते झाल्यावर आणि खेळपट्टी भाजपला अनुकूल झाल्यावर निवडणुका घ्यायच्या, असे राजकीय गणित आहे. शिंदे गटाची मुंबईत फारशी ताकद नाही. त्यामुळे भाजप व शिवसेनेतच टक्कर असून जे ‘ मनसे ‘ त्यांच्याबरोबर आहेत, त्यांची मदत लाभणारच आहे. त्यामुळे आपली नसलेली विधानसभेची जागेची जागा दोन वर्षांसाठीच्या पोटनिवडणुकीत सोडून दिली, तर महापालिका निवडणुकीत आणि २०२४ मध्ये अधिक राजकीय लाभ होतील, असा फायद्याचा सौदा भाजपने केला.

हेही वाचा : विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?

पराभवाच्या भीतीने भाजपने माघार घेतली, ही वस्तुस्थिती असली तरी आतबट्ट्याचा व्यवहार करण्यापेक्षा दूरदृष्टीने विचार करण्याचा धोरणीपणा भाजपने दाखविला. पण राजकारणात प्रत्येक वेळी सर्वच फासे आपल्या बाजूने पडतात, असे नाही. उद्धव ठाकरे हे सर्वसामान्यांची सहानुभूती वाढविण्यासाठी आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजप व शिंदे यांच्याविरूद्धच्या संतापात भर पडण्यासाठी प्रयत्न करणार, हे उघड आहे. त्या खेळीवर मात करून महापालिका निवडणुकीची खेळपट्टी अनुकूल करण्याचे आव्हान फडणवीस-शेलार जोडगोळी आणि भाजप पक्षश्रेष्ठींपुढे आहे.