मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप दिवाळीनंतर प्रचारसभांचा राज्यभरात धुरळा उडविणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी नेत्यांच्या राज्यभरात १०० हून अधिक सभांचे नियोजन भाजपकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : राजकारणातील बड्या चेहऱ्यांची यंदा वंचितकडे पाठ

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत आहे. त्यानंतर ५ नोव्हेंबरपासून राज्यात विभागनिहाय सभांचे आयोजन करण्यात येत आहे. मोदी हे परदेश दौऱ्यांवर जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्या ७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान आठ-दहा सभांचे नियोजन करण्यात येत आहे. शहा हे १८-२० सभा घेणार असून गडकरी हे विदर्भासह राज्यात ३५-४० सभा घेतील. उत्तर भारतीय मतदारांची संख्या अधिक असलेल्या मतदारसंघात आणि अन्यत्रही योगी आदित्यनाथ यांच्या अधिकाधिक सभा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्याही १५ ते २० सभा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. फडणवीस हे सर्वच विभागात सभा घेणार असून त्यांच्या ५० हून अधिक सभा होणार आहेत.