रामदासभाई तोंड सांभाळून बोला. आमच्या नेत्यांसोबत केलेली आक्षेपार्ह विधान आम्ही खपवून घेणार नाही. दापोली विधानसभा मतदारसंघ ही तुमची जहागिरी नाही. सगळीकडे फक्त मीच असा विषय काही चालणार नाही, असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दिल्याने भाजपने आता कदमांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा नेत्यांबाबत कदम सातत्याने आक्षेपार्ह विधान करत आहेत, अशी तक्रार करुन साठे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात दिलेल्या विकास कामाच्या निधीबाबत कदम टीका करत आहेत. आम्हाला सातत्याने स्थानिक आमदाराचा हक्कभंग होत असल्याचे सांगत आहेत. मात्र हर्णे येथील केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेतून बंदराला मिळालेल्या मंजूर विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावही घेतलं नाही. त्यांचा फोटोही लावला नाही. त्या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही फोटो लावला नाही. मग हा हक्कभंग होत नाही का ? लोकसभा निवडणुकीतही रामदास कदम यांनी केलेल्या चुकीच्या विधानमुळेच महायुतीला फटका बसला आहे त्यामुळेच महायुतीचे मताधिक्य कमी झाल आहे. आम्ही या सगळ्याचा अहवाल आमच्या वरिष्ठ नेत्यांकडेही दिला आहे.

हेही वाचा…चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडी, महायुतीत ‘उदंड जाहले इच्छुक’!

दापोली विधानसभेबरोबरच गुहागर विधानसभा मतदारसंघही शिवसेनेचा आहे. त्या ठिकाणीही मताधिक्य देऊ, असे कदम सांगत होते. मात्र कोणते विधानसभा मतदारसंघ कोणाला सोडायचे हे महायुतीचे नेते ठरवतील. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम कदमच करत आहेत असाही आरोप साठे यांनी केला. लोकसभेला महायुतीला दापोली विधानसभा मतदारसंघात मताधिक्य कमी मिळाले आहे. यावेळेस आम्हीही दापोली व गुहागर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ हा भाजपाला मिळावा, अशी मागणी करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.

कुणबी समाजाची गेल्या अनेक वर्षांची कुणबी भवनाच्या जागेसाठीची मागणी आहे. यासाठी शासकीय जागेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. बांधकाममंत्री चव्हाण यांनी कुणबी समाजभवन बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र यावरून रामदास कदम वाईट वाटण्याचं कारण नाही. राष्ट्रीय जल जीवन मिशनच्या कामांची भूमिपूजने केली. मात्र सध्याच्या कामांची स्थिती काय आहे? या कामांचा बोजवारा उडतो आहे. आपण भूमिपूजन मोठ्या थाटामध्ये केलीत मग त्या कामांची पालक म्हणून जबाबदारी घ्या, असेही त्यांनी सुनावले आहे.

हेही वाचा…१८ व्या लोकसभेला उपाध्यक्ष असणार; विरोधकांना पद देण्याची काँग्रेसची मागणी

शिवसेनेचे नेते म्हणून कदम पत्रकार परिषद घेतात आणि प्रत्येक पत्रकार परिषदेत ते मुलगा म्हणून आमदार योगेश कदम यांची बाजू घेऊन भांडतात. आमचे नेते रवींद्र चव्हाण यांच्याबाबत वारंवार अनुद्गार रामदास कदम यांनी काढले. आमचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अनुदार उद्गार काढत आहेत. विनाकारण त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या विषयानंतर आता त्यांचा मुलगा आमदार योगेश यांनी एकदा त्यांची या सगळ्या विषयात भूमिका स्पष्ट करावी, असेही थेट आव्हान केदार साठे यांनी दिले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp s kedar sathe warns ramdas kadam over offensive remarks going to demand for dapoli and guhagar constituencies print politics new psg
First published on: 30-06-2024 at 15:07 IST