मुंबई : विधानसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपच्या केंद्रीय छाननी समितीची सोमवार किंवा मंगळवारी नवी दिल्लीत बैठक होण्याची शक्यता असून त्याआधी प्रदेश सुकाणू समितीकडून पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे रविवारी रात्री ठरविण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपमध्ये घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक संचालन समिती प्रमुख रावसाहेब दानवे आदींच्या उपस्थितीत रविवारी बैठक झाली. राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थिती, मराठा आरक्षणासह राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय महत्त्वाचे मुद्दे, पक्षपातळीवर त्याला तोंड देण्यासाठीची रणनीती व मतदान केंद्रनिहाय निवडणूक तयारी आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा >>>लवकरच राज्यभर दौरे, पंकजा मुंडे यांची घोषणा; गोरगरिबांसाठी कामे करण्याचा निर्धार
भाजप पक्षश्रेष्ठींनी फडणवीस, बावनकुळेंसह राज्यातील प्रमुख नेत्यांना सोमवारी नवी दिल्लीत पाचारण केले असून सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी केंद्रीय छाननी समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. भाजपने जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारांसंदर्भात शिफारशी मागविल्या होत्या. त्यावर प्रदेश सुकाणू समितीने विचार करून राज्यातील नेत्यांकडून उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात येणार आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत या नावांसह अन्य नावांवर आणि मतदारसंघनिहाय करण्यात आलेल्या सर्वेक्षणांवर विचार करून केंद्रीय संसदीय मंडळाकडे नावांची शिफारस करण्यात येईल. त्यानंतर पुढील शनिवार-रविवार केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक झाल्यास उमेदवारांची नावे अंतिम होऊन भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
निवडणुकीच्या घोषणेनंतर पहिली यादी?
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा एक-दोन दिवसांमध्ये अपेक्षित असून भाजपची पहिली यादी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत किमान ७०-८० हून अधिक उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे.