सुहास सरदेशमुख
औरंगाबाद : राज्यातील तीन शिक्षक व दोन पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणी गुरुवारपासून सुरू होणार आहे. यामध्ये औरंगाबाद, कोकण आणि नागपूर येथील शिक्षक मतदारसंघ तर अमरावती व नाशिक येथील पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय तयारी आता सुरू झाली असून फेब्रुवारी २०२३ मध्ये या निवडणुका होतील असा अंदाज आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघावर राष्ट्रवादीचा पगडा असून या मतदारसंघात ६२ हजाराहून अधिक मतदान होते. काही शाळा वाढल्याने या मतदारसंघाची नोंदणी ६५ ते ७० हजाराच्या घरात जाईल, असे सांगण्यात येत आहे. या मतदारसंघात भाजप परिवारात अद्यापि चेहरा नसल्याचे चित्र आहे. ही निवडणूक महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेकडून लढविली जाते. तांत्रिकदृष्या तो भाजपचा उमेदवार नसतो. शिक्षक परिषदेचा उमेदवारच भाजपशी संबंधित असल्याचे मानून काम केले जाते. कोकण व मुंबई विभागात या शिक्षक परिषदेचे आतापर्यंत १९ वेळा आमदार निवडून आले होते. पण मराठवाडा आणि नाशिकमध्ये या मतदारसंघातून यश मिळाले नसल्याचे या संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष किरण भावठाणकर यांनी सांगितले.
१४ जुलै १९९१ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी माध्यमिक शिक्षक परिषद, विदर्भ शिक्षक परिषद व कोकणात शिक्षण क्रांती दल म्हणून परिवारातील कार्यकर्ते काम करत होते. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून विक्रम काळे यांनी सलग तीन वेळा विजय मिळविला आहे. दरम्यान या मतदारसंघाची आता गरजच उरली नाही, असे म्हणत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी गुणवत्तेसाठी आग्रह धरला होता. त्यामुळे चिडलेल्या शिक्षकांनी मोर्चाही काढला होता.
हेही वाचा : आदिती तटकरे व तटकरे कुटुंबासह रायगडमधील सर्व पक्षीय नेत्यांचा राजकीय दांडिया
आमदार प्रशांत बंब यांचे मतदारसंघ रद्द करण्याबाबतचे मत वैयक्तिक असल्याचा खुलासा अलिकडेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्यामुळे या मतदारसंघात घुसण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना लावण्यात येत आहे. मात्र, या मतदारसंघात सातत्याने काम करणारा उमेदवार नसल्याचे चित्र अजूनही कायम आहे. तीन वेळा मतदारसंघातून निवडून आल्याने सरकार आल्यानंतर मंत्रीही करा , अशी मागणी आमदार विक्रम काळे यांनी जाहीरपणे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विक्रम काळे यांना चांगलेच सुनावलेही होते. या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार तेच असतील असे मानले जात आहे. गेल्या वेळी ही निवडणूक बीडचे प्रा. सतीश पत्की यांनी लढविली होती.