नगरः राज्यात धनगर समाजाची मते प्रभाव टाकू शकतील असे जे मतदारसंघ आहेत, त्यामध्ये नगर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हीच बाब लक्षात घेऊन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट या दोघांनीही समाजाला आकर्षित करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारातील मुद्द्यांवरून ते अधोरेखित होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी त्यासाठी समाजाला चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे उघडपणे दिसत आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याचे श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे तर समाजाला आरक्षण देण्यात भाजप अयशस्वी ठरल्याचा ठपका शरद पवार यांच्याकडून ठेवला जात आहे.
शरद पवार यांच्याकडून धनगर समाजातील, होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांचे नेतृत्व पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नगरमध्ये नीलेश लंकेंच्या प्रचारार्थ पवार होत असलेल्या सभांतून भूषणसिंहराजे यांना जाणीवपूर्वक उपस्थित राहात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय विखे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेतही अहमदनगरच्या नामांतराच्या मुद्यावर भर देत, नामांतरास केंद्र सरकारची परवानगी बाकी असल्याने त्यासाठी विखे यांना दिल्लीत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा – TMC पेक्षा १ जागा जास्त जिंकलो तरी ममता सरकार पडेल; बंगाल भाजपा प्रमुखांचा दावा
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ‘नगर व्हिजन’ तयार केले आहे. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सर्वात मोठा पुतळा व स्मारक नगर शहरात उभारुन पर्यटन विकासाला चालना देण्याचे आश्वासन दिले आहे. या सर्व मुद्यातून दोन्ही बाजूंनी धनगर समाजाची मते आकर्षित करण्याचे कसे प्रयत्न होत आहेत, यावर प्रकाश पडतो आहे. दोन्ही पक्षांकडून मराठा समाजातील उमेदवार दिले गेल्याने त्यांच्यासाठी धनगर समाजाची मते निर्णायक ठरु शकतात.
गेल्या दोन-तीन निवडणुकीतून धनगर समाज भाजपच्या मागे उभा राहिल्याचे चित्र होते, त्यामध्ये आता काहीसा बदल होताना दिसतो आहे. मध्यंतरी नामांतराच्या मुद्यावर मंत्री विखे यांनी केलेले वक्तव्य, सोलापूरमधील घटना यामुळे धनगर समाज आक्रमक झाला होता. परंतु विखे यांनी तातडीने भूमिका बदलत समाजाच्या नेत्यांशी जवळीक वाढवली. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पारनेरमधील लोकर संशोधन केंद्राच्या जागेचा प्रश्न मार्गी लावला. मात्र पशूवैद्यकीय महाविद्यालय पारनेरऐवजी राहाता तालुक्यात नेण्याचा निर्णय पसंत पडलेला नाही.
हेही वाचा – मुस्लीम ते ख्रिश्चन, एझावा ते दलित; केरळमध्ये जातीय समीकरणावर ठरणार निकालाचे गणित
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राधाकृष्ण विखे व माजीमंत्री आमदार राम शिंदे यांच्यामध्ये वादाचा भडका उडाला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने त्यावर पडदा पडला. आमदार शिंदे हे सुजय विखे यांच्या प्रचारात सक्रिय झाले. आमदार शिंदे धनगर समाजातील नेते असले तरी विखे-शिंदे यांच्यातील वाद पक्षांतर्गत नव्या-जुन्यांचा होता. तो समाजाशी निगडीत नव्हता. भाजपने शिंदे यांना समाजातील नेतृत्व म्हणून पुढे आणले असले तरी शिंदे यांनी जिल्ह्यात त्यादृष्टीने बांधणी केलेली नाही. त्यामुळे भाजप व विखे या दोघांनाही आपली बाजू अधिक बळकट करण्यासाठी समाजातील वेगळ्या चेहऱ्याची आवश्यकता भासत आहे.