BJP Politics News : दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर भाजपाने पक्षातील अंतर्गत कलहांवर लक्ष केंद्रित केलं आहे. निवडणुकीवेळी आपापल्या राज्यातील पक्षनेतृत्वावर टीका करणाऱ्या तीन वरिष्ठ नेत्यांना भाजपाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या तिन्ही नेत्यांवर पक्षशिस्त मोडणे आणि विचारसणीविरुद्ध काम करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचा नोटिसा बजावण्यात सहभाग असल्यामुळे पक्षाच्या शिस्तीला महत्त्व देण्याची धारणा आणखी बळकट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपातील नेते आणि मित्रपक्षांमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे.
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केलेल्या काही प्रादेशिक पक्षांच्या चेहऱ्यांना भाजपाचे नेते सतत लक्ष्य करीत आहेत. हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत असे अनेक प्रकार घडले आहेत. दरम्यान, निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाने या नेत्यांना इशारा देत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “या कारवाईचा संबंध निवडणूक निकालांशी जोडता येणार नाही.”
ते म्हणाले की, “ज्या नेत्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, त्या नेत्यांमुळे पक्षाच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो. त्यामुळे कधीकधी, असभ्य टिप्पण्या थांबवण्यासाठी अशा कारवाईची आवश्यकता असते. संपूर्ण पक्षनेतृत्व दिल्ली विधानसभा निवडणुकीत व्यस्त असताना नोटिसा बजावण्यासाठी आम्हाला वेळ मिळत नव्हता. निवडणुका संपल्यानंतर या नेत्यांना लेखी उत्तरे मागण्यात आली आहेत. ज्या राज्यांमधील हे नेते आहेत, त्या राज्यांच्या निवडणुका अजून खूप दूर आहेत”, असं भाजपा नेत्याने स्पष्ट केलं आहे. “राष्ट्रीय पातळीवर एनडीएचे सहयोगी पक्ष सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ज्यामुळे पक्षाला कोणतेही आव्हान नाही. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाबद्दल लोकांची धारणा मजबूत होते आणि विरोधकांचे मनोबल कमी होते”, असंही ते म्हणाले आहेत.
बिजापूरचे आमदार बसनगौडा यांना कारणे दाखवा नोटीस
सोमवारी, भाजपाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने कर्नाटकमधील बिजापूर शहरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांना दुसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते बी.एस येडियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय विजयेंद्र यांना ते सातत्याने लक्ष्य करीत होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये विजयेंद्र यांची कर्नाटक भाजपा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विजयेंद्र यांच्यावर टीका भाजपाने आमदार यत्नल यांना पहिल्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावेळी पक्षातील नेत्यांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणीही केली होती.
हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनाही भाजपाने पाठवली नोटीस
हरियाणाचे मंत्री आणि सात वेळा आमदार राहिलेले अनिल विज यांनाही सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीला पुढील तीन दिवसांत विज यांनी उत्तर द्यावं, असं भाजपा प्रदेशाध्यक्षांनी म्हटलं आहे. हिमाचल येथील एका हॉटेलमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर बलात्कार केला, अशी तक्रार दिल्लीतील एका तरुणीने दिली होती. यानंतर पोलिसांनी मोहनलाल बडोली यांच्यावर एफआयआर दाखल केला. याप्रकरणानंतर विज यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला होता आणि मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनाही त्यांनी लक्ष्य केलं होतं.
राजस्थानच्या ज्येष्ठ मंत्र्यांनाही कारणे दाखवा नोटीस
हरियाणाच्या शेजारील राजस्थानमध्येही ज्येष्ठ मंत्री किरोरी लाल मीणा यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने माझे फोन टॅप केले, असा आरोप किरोरी लाल यांनी केला होता. या आरोपानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. सोमवारी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी किरोरी लाल नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे.
अनिल विज यांनी केला होता मुख्यमंत्रीपदावर दावा
हरियाणात ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनिल विज यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. इतकंच नाही तर पक्षातील अदृश्य शक्तींनी माझा पराभव करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही विज यांनी केला होता. तर राजस्थानमधील ज्येष्ठ मंत्री किरोरी लाल मीणा यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करत राज्यात खळबळ उडवून दिली होती. यानंतर भाजपा नेतृत्वाने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती.
कर्नाटकमध्ये भाजपात अंतर्गत कलह
भाजपाच्या अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, कर्नाटकमधील भाजपातील अंतर्गत कलह वाढतच चालला आहे. कारण, विजयेंद्र यांच्यावर टीका करण्यासाठी आमदार यत्नल यांना पक्षातील वरिष्ठ नेतेच पाठबळ देत आहेत. विजयेंद्र हे ‘दुराचारी आणि चरित्रहीन’ आहेत, असा घणाघात यत्नल यांनी केला आहे. त्यांच्या गटातील दुसरे आमदार रमेश जारकीहोळी यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांना ‘बच्चा’ म्हणून संबोधलं आहे. सूत्रांनी सांगितले की, येडियुरप्पा यांचे पक्षाशी गोड-कडू संबंध राहिलेले आहेत.लिंगायत समुदायातील मतदारांवर त्यांचा प्रभाव असल्यामुळे भाजपा नेतृत्वाचे येडियुरप्पा यांच्याशी नेहमीच वेगळेच समीकरण आहे.
हेही वाचा : Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे आणि शिवसेना नेत्यांची भेट का घेतली?
माजी मुख्यमंत्र्यावर ४० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप
लिंगायत समुदाय हा राज्यातील भाजपाचा मुख्य मतदार मानला जातो. या समुदायातील नेते बी.एल. संतोष यांचे सहकारी मानले जाणारे आमदार यत्नल हे विजयेंद्र यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. कारण, त्यांचा येडियुरप्पांचा यांची जागा घेऊन राज्यात स्वत:ची ओळख निर्माण करायची आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये यत्नाल यांनी विजयेंद्र आणि येडियुरप्पा यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. करोना काळात माजी मुख्यमंत्र्यांनी ४० हजार कोटींचा घोटाळा केला, असा आरोप त्यांनी केला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला कर्नाटकमध्ये मोठा फटका बसला होता. यानंतर आमदार यत्नल यांनी विजयेंद्र आणि येडियुरप्पा यांच्यावर टीका करणे टाळलं होतं.
दिल्ली आणि मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी?
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यापासून भाजपकडे मोठ्या प्रमाणात शिस्तबद्ध पक्ष म्हणून पाहिलं जातं. सध्या भाजपातील नेते दिल्ली आणि मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता बाळगून आहेत. मात्र, त्याआधीच पक्षश्रेष्ठींनी वाचाळवीर नेत्यांना कारणे दाखव नोटिसा बजावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्ली आणि मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतला जाईल, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
मणिपूर हे असे एकमेव राज्य आहे, जिथे भाजपने सत्ता परिवर्तनाची कारवाई केली आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांना भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने राजीनामा देण्यास सांगितलं होतं. कारण, गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये तणाव सुरू आहे. भाजपा आमदारांच्या एका गटाकडून सातत्याने एन. बिरेन सिंग यांना विरोध करण्यात येत होता आणि त्यानंतर पक्षनेतृत्वाने त्यांची हकालपट्टी केली.