Rajasthan Assembly Elections: राजस्थान विधानसभा निवडणुकीला फक्त आठ महिने बाकी असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाने गुरूवारी (दि. २३ मार्च) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी सतीश पुनिया यांना बाजूला सारत चित्तोडगढचे खासदार चंद्र प्रकाश जोशी यांच्याकडे ही जबाबदारी दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण व्यक्तिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याची निकड भाजपाला का लागली? यामागे कोणते राजकारण आहे? अशी चर्चा आता राजस्थानच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. जोशी ऑगस्ट २०२० पासून भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार चंद्र प्रकाश जोशी हे ब्राह्मण समुदायातून आलेले नेते आहेत. संघाच्या मुशीत तयार झालेल्या जोशी यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून केली. महाविद्यालयात असताना ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. पुढे भडेसर पंचायत समितीमधून ते जिल्हा परिषद सदस्य बनले आणि उप-प्रधान हे पद देखील त्यांनी भूषविले. यासोबतच त्यांनी राजस्थान भारतीय जनता युवा मोर्चाच्या अनेक पदावर देखील काम केले होते.

२०१४ साली देशात मोदी लाट पसरलेली असताना त्या लाटेवर स्वार होत जोशी चित्तोडगढ लोकसभा मतदारसंघातून ३.१६ लाख मते घेऊन निवडून आले. २०१९ साली त्यांनी ५.७८ लाखांच्या फरकाने पुन्हा विजय मिळवला. काँग्रेसमधील प्रतिस्पर्धी गोपाल सिंह शेखावत यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. हा राजस्थानमधील द्वितीय क्रमाकांचा सर्वाधिक मताधिक्याने झालेला विजय होता. पहिल्या स्थानावर भाजपाचेच सुभाष चंद्रा बहेरिया हे भिलवाडा मतदारसंघातून ६.१२ मताधिक्याने निवडून आले होते.

निवडणुकीच्या वर्षात भाजपाने ब्राह्मण प्रदेशाध्यक्ष देऊन या समुदायातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. राजस्थानमध्ये याआधी चार वेळा ब्राह्मण मुख्यमंत्री झाले आहेत. समुदायातील शेवटचे मुख्यमंत्री तीन दशकांपूर्वी झाले होते. मावळते प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया हे जाट समुदायातील आहेत. ब्राह्मण समुदायापेक्षा त्यांची संख्या जास्त आहे. अद्याप जाट समुदायाचा एकही मुख्यमंत्री झालेला नाही.

सद्यपरिस्थितीत जेव्हा जव्हा भाजपामध्ये ब्राह्मण नेतृत्वाची चर्चा व्हायची, तेव्हा एकही नेता उपलब्ध नसायचा. भाजपामध्ये शेवटचे सर्वात मोठे ब्राह्मण नेते म्हणून घनश्याम तिवारी यांच्याकडे पाहिले जात होते. सहावेळा आमदार राहिलेल्या तिवारी यांनी वसुंधरा राजे यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. २०१८ साली विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र अल्पावधीतच त्यांची घरवापसी झाली. भाजपानेही त्यांचा सन्मान करत राज्यसभेची खासदारकी देऊ केली. मात्र वयवर्ष ७५ झालेल्या घनश्याम तिवारी यांची आता पक्षावर पुर्वीसारखी पकड राहिलेली नाही.

याउलट जोशी हे फक्त ४७ वर्षांचे आहेत. तर मावळते अध्यक्ष पुनिया हे ५८ वर्षांचे आहेत. राजस्थानमधील ब्राह्मण पंचायतने मागच्या आठवड्यातच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा सत्कार करून ब्राह्मण समुदायातील आश्वासक चेहरा म्हणून त्यांचा गौरव केला होता. तथापि, जोशी हे काही बाबतीत वैष्णव यांच्यापेक्षाही उजवे ठरतात. जोशी यांची ओळख संघटक म्हणून आहे, तर वैष्णव यांनी बराच काळ नोकरशाहीत घालवला आहे.

वैष्णव यांचा सत्कार करण्यात आलेल्या ब्राह्मण महापंचायतीच्या व्यासपीठावर जोशी यांनीही भाषण दिले होते. यावेळी त्यांनी आपल्या जातीचा अभिमान मिरवत असताना सांगितले की, या देशाला आणि जगाला चालवणारा कुणी असेल तर तो ईश्वर आहे आणि ईश्वर मंत्रांच्या ताब्यात आहे. मंत्र ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत. म्हणूनच ब्राह्मण समाजाला उगाचच आदर मिळत नाही. याशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्राह्मण समुदायातीलच लोक सर्वात पुढे होते, अशीही आठवण त्यांनी करून दिली.

यावेळी बोलत असताना जोशी यांनी आपल्या समाजाला तीन कानमंत्र दिले. “पहिला मंत्र, ब्राह्मण समाजाने एकमेकांचे पाय खेचने आणि एकमेकांविरोधात वाईट बोलणे बंद करावे. दुसरे, जर एखाद्या अधर्मी व्यक्तिने हिंदूच्या मुलींबाबत वेडेवाकडे काही केल्यास परशुरामाचे पुत्र म्हणून आपण सर्वांनी एकत्र आले पाहीजे. तिसरे, आपल्या समाजातील एखाद्या गरीब मुलीला जर कन्यादान आणि शिक्षणासाठी मदत हवी असेल तर समाजातील इतर लोकांनी तिला मदतीचा हात दिला पाहीजे आणि पुढे आणले पाहीजे.” महापंचायतमध्ये भाषण करण्याआधी नोव्हेंबर २०२२ रोजी जोशी चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. एका सामान्य व्यक्तिकडे संबंधित कर्मचाऱ्याने लाच मागितली असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.

जोशी यांच्या नियुक्तीचे परिणाम काय होतील? हे आताच सांगणे कठीण आहे. गुलाब चंद्र कटारिया यांच्यानंतर पहिल्याच वेळेस आमदार झालेल्या पुनिया यांची सप्टेंबर २०१९ रोजी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पुनिया हे राजस्थान भाजपामधील दुसरे नेते होते, ज्यांचे वसुंधरा राजेंसोबत कटू संबंध होते. कटारिया यांची मागच्या महिन्यात आसामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांनी सांगितले की, पुनिया हे संघटनेचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष भविष्यात देखील वाटचाल करत राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp shuffle in rajasthan surprise brahmin leader mp chandra prakash joshi brought in as state chief kvg