नागपूर : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरातील महाप्रबोधन यात्रा-२ च्या सभेत भाजपवर सडकून टीका केली तसेच अनेक प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले. मात्र त्यावर अद्यापही भाजपकडून प्रतिउत्तर देण्यात न आल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रा-२ ची सुरुवात नागपूरमधून झाली. यात्रेची फार प्रसिद्धी न झाल्याने सभेला अपेक्षित गर्दी नव्हती. मात्र नेहमीप्रमाणे अंधारे यांनी आक्रमक भाषण करून सभा गाजवली. त्यांनी सभेत भाजप व या पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले. राज ठाकरे यांच्याप्रमाणे ‘लावरे व्हिडीओ’ म्हणत भाजप नेत्यांच्या वक्तव्याच्या जुन्या चित्रफिती दाखवून नेत्यांच्या बदलत्या भूमिकेचा समाचार घेतला. भाजपचा उल्लेख त्यांनी ‘पक्ष फोडणारी पार्टी’ असा केला. पुण्यातील एका कारखान्यातील कंत्राटी कामगारांबाबत भाजपने विरोधी पक्षात असताना आणि आता सरकारमध्ये असताना घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हेही वाचा – राजस्थानात वसुंधरा राजेंचे दमदार ‘पुनरागमन’
मुंबईमध्ये पूर आला तर शिवसेनेवर टीका आणि नागपूरमध्ये पूर आला तर प्रशासन जबाबदार असा भेदभाव का? उद्धव ठाकरेंवर घरी बसून प्रशासन चालवण्याचा आरोप करणारे आता सत्तेत असताना सरकारी रुग्णालयात मृत्यू का वाढले ? याला जबाबदार कोण? मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांनी केलेल्या काल्पनिक आरोपांवरून तत्कालीन गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणारा भाजप आता त्यांच्या पक्षातील मंत्र्यांवर आरोप होऊनही गप्प का? ज्या राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना सत्तेत सहभागी का केले? असे अनेक प्रश्नही त्यांनी सभेत उपस्थित केले आणि सरकारने यावर उत्तर द्यावे अशी मागणी केली.
सभा नागपूरमध्ये असल्याने अंधारे सत्ताधारी भाजपला, नेत्यांना लक्ष्य करतील हे अपेक्षित होतेच. पण भाजपचा आजवरचा अनुभव लक्षात घेतला तर त्यांच्याकडूनही लगेचच जशास तसे उत्तर दिले जाईल, असाही अंदाज वर्तवण्यात येत होता. कारण यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नागपूरमधील सभेत केलेल्या टीकेला भाजपने लगेच सभा संपल्यावर उत्तर दिले होते. आताही अंधारे यांनी केलेली टीका ही कठोर होती. मात्र भाजप गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंधारे यांना अनुल्लेखाने मारणे ही भाजपची खेळी असू शकते, पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांतून नवे प्रश्न निर्माण होत असल्याने त्याचे काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
हेही वाचा – Telangana : प्रेषितांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राजा सिंहला भाजपाकडून पुन्हा उमेदवारी
“अंधारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला विशेष महत्त्व देण्याची गरज नाही. नागपूरचा पूर ही नैसर्गित आपत्ती होती. सरकारी रुग्णालयातील मृत्यू ही दुर्दैवी बाब आहे, मात्र त्याला महायुतीचे सरकारच जबाबदार आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व कारणीभूत आहे. त्यासाठी इतरांना दोष देण्यापेक्षा त्यांनी स्वत: आत्मपरिक्षण करावे. स्वत: अंधारे यांच्या विषयी पक्षात नाराजी आहे. महिला नेत्या पक्ष सोडून जात आहेत. त्यांनी पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत काय वक्तव्ये केली होती हे आठवून पाहावे, नंतर दुसऱ्यांवर टीका करावी, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.