BJP: भाजपाने १२ राज्यांमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष निवडले आहेत. तरीही भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड अद्याप पार पडलेली नाही. लवकरच ते निवडले जातील असं दिसतं आहे. मात्र या प्रक्रियेसाठी किमान महिनाभराचा कालावधी जाईल अशी शक्यता आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने इंडियन एक्सप्रेसला या संदर्भातली माहिती दिली आहे. भाजपाची राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठीची गती काहीशी मंदावली आहे असं दिसून येतं आहे. याचीच चर्चा सध्या देशपातळीवर सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे. पी. नड्डा हे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष

जे.पी. नड्डा हे भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. २०१९ मध्ये जे. पी. नड्डा कार्यकारी अध्यक्ष झाले. अमित शाह यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून नड्डा यांची ओळख आहे. त्यानंतर २०२० मध्ये नड्डा यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करण्यात आली. आता पाच वर्षांनी त्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याची चर्चा रंगलेली असतानाच नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी जो वेळ घेतला जातो आहे त्याचीही चर्चा पक्षाच्या अंतर्गत रंगली आहे.

भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी महिनाभरात प्रक्रिया सुरु होणार

भाजपाच्या घटनेनुसार आणखी सहा राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येतील. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठीची प्रक्रिया सुरु होईल. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया व्हायला हवी होती पण ती होऊ शकलेली नाही. आता आणखी एक महिना जाईल असं एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं आहे. भाजपाचं हे आस्ते कदम का? हे आता पाहणं महत्त्वाचं असेल.

दिल्लीत २७ वर्षांनी भाजपाची सत्ता

भाजपाला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ४८ जागा मिळाल्या आहेत. या घवघवीत यशामुळे दिल्लीत २७ वर्षांनी भाजपाची सत्ता आली आहे. मध्य प्रदेशातल्या एका नेत्याने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार पक्षाने सगळी शक्ती दिल्ली विधानसभा जिंकण्यावर केंद्रीत केली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया काहीशी मंदावली होती असंही एका नेत्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. झारखंडमधल्या एका भाजपा नेत्याने सांगितलं की आपण जसं पाहतो की कधी कधी ट्रेन्स या प्लॅटफॉर्मच्या अलिकडे रुळावरच थांबलेल्या असतात. प्लॅटफॉर्मवर येऊन ट्रेन थांबेल यासाठीची आवश्यक तयारी झालेली नसते. आत्ता राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत भाजपात अशीच स्थिती दिसते आहे.

विविध चर्चांना उधाण आलं होतं पण…

उत्तर प्रदेशातल्या एका नेत्याचं म्हणणं आहे की जिल्हा पातळीवरच्या निवडणुका होणं बाकी आहेत. त्या राज्यात सुरु झाल्या की भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग येईल. विविध कारणं समोर येत आहेत. मात्र भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड का लांबते आहे याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाईल अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असं सांगितलं होतं. दरम्यान निवडणुकीत भाजपासह महायुतीला २३७ जागा मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांची या पदावर निवड होण्याची शक्यता मावळली आहे. आता भाजपा कुणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच या वेळीही धक्कातंत्राचा वापर करुनच एखादं नाव समोर येतं का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.